गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी...
By Admin | Published: November 27, 2015 01:08 AM2015-11-27T01:08:33+5:302015-11-27T01:11:28+5:30
गुजरातच्या लेखकांचा सूर : सहिष्णुता वाढीसाठी प्रयत्न, पुरस्कार वापसीतून भावना व्यक्त
कोल्हापूर : गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी आहे. सन २००२ नंतर तेथे विविध मार्गाने विचार दडपण्याचे प्रकार वाढत आहेत. अलीकडे पोषक वातावरण असल्यामुळे देशभर असहिष्णुतेची धार वाढते आहे, असा सूर गुजरातमधील लेखक, साहित्यिक यांच्यातून गुरुवारी येथील पत्रकार परिषदेत निघाला. पुरस्कार वापसी करून विचारवंत आपल्या भावना व्यक्त करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. सहिष्णुता आणि असहिष्णुता यासंबंधी देशभरात निर्माण झालेल्या प्रश्नांसंबंधी लोकभावना समजून घेण्यासाठी ‘दाक्षिणायन’ मोहिमेंतर्गत गुजरातमधील लेखकांचा जत्था येथे आला आहे. येथील गायन समाज देवल क्लबमध्ये अच्युतराव भांडारकर कलादालनात पत्रकार परिषदेत या साहित्यिकांनी आपले विचार मांडले. चित्रपट निर्माते परेश नायक (गुजरात) म्हणाले, गुजरातमध्ये जन्मलेल्या असहिष्णुतेने २००२ ते २०१५ पर्यंत टोक गाठले आहे. विचार स्वातंत्र्यावरच घाला घातला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर देशभर असहिष्णुतेची लाट पसरली आहे. सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी, विचारवंत असहिष्णुतेला विरोध करीत पुरोगामी विचार जनतेपर्यंत पोहोचवित आहेत.डॉ. गणेश देवी (गुजरात) म्हणाले, असहिष्णुतेसंबंधी निर्माण झालेल्या लोकभावना समजून घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांत गुजरातमधील आम्ही साहित्यिक दौरा करीत आहोत. गुजरात असहिष्णुतेची कार्यशाळा आहे. वेगळा विचार मांडणाऱ्या विचारवंतांची हत्या करणे चिंताजनक आहे. देशभरात असहिष्णुतेचे ढग गडद होत चालले आहेत. त्यामुळे साहित्यिक, विचारवंत, चित्रपट निर्माते, कष्ट आणि मूल्यांचा सन्मान म्हणून स्वीकारलेला पुरस्कार शासनाकडे परत करीत आहेत. पुरस्कार वापसीनंतर आता ज्याप्रमाणे आमिर खानवर आरोप, टीका होत आहे, त्याप्रमाणे साहित्यिकांवरही होत आहेत. मात्र, देश कोणा एका नेत्याचा किंवा पक्षाचा नाही. यावेळी अनिल जोशी (गुजरात), प्रवीण बांदेकर, गणेश विस्पुते (सावंतवाडी), प्राचार्य राजेंद्र कुंभार, संजीव खांडेकर (मुंंबई) यांनी विचार मांडले. यावेळी मेघा पानसरे, राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव, उदय नारकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, गुजरातहून आलेले साहित्यिक डॉ. गणेश देवी, मनीष जानी, उत्तम परमार, कानजी पटेल, अनिल जोशी, परेश नायक यांनी सकाळी अॅड. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बिंदू चौकातील अॅड. पानसरे यांच्या कार्यालयास भेट दिली. (प्रतिनिधी)
आरएसएस, भाजपचे असहिष्णुतेला प्रोत्साहन
गुजरात नवनिर्माण आंदोलनाचे संस्थापक मनीष जानी म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून गुजरातमध्ये असहिष्णुता आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. त्यांच्या विरोधात बाहेर पडलेल्या बळिराजांचा आवाज दडपला जात आहे. असहिष्णुतेला आरएसएस आणि भाजप प्रोत्साहन देत आहेत. पानसरे यांच्या हत्येनंतर तीन दिवस बंद करणाऱ्या कोल्हापूरकरांना सलाम आहे.
दबाव अन् दबावच...
शासनाचा पुरस्कार तुम्ही परत केल्यानंतर शासन व अन्य घटकांकडून दबाव येत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना देवी म्हणाले, दबाव नसलेला एक मिनीटही नाही. जो भीतो तो क्षणाक्षणाला मरत असतो. ज्याला भीती नाही, तो मरत नाही. अशाप्रकारे दबावाला बळी न पडता आमचे काम सुरू आहे.