पिसाळलेल्या कुत्र्याचा सह जणांना चावा
By admin | Published: September 18, 2016 01:53 AM2016-09-18T01:53:53+5:302016-09-18T01:53:53+5:30
सुधागड तालुक्यातील पालीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने एका दिवसात सहा जणांना चावा घेतला
पाली : सुधागड तालुक्यातील पालीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने एका दिवसात सहा जणांना चावा घेतला आहे. कुत्र्याने घातलेल्या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. पालीमधील बाजारपेठे, तहसील कार्यालय, आगरआळी, टेंभीवाडी, चर्मकार वाडा आदी ठिकाणी एका दिवसात सहा जणांना कुत्र्याने जखमी केले आहे. त्यांच्यावर पाली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हर्ष नितीन पालकर (१४, रा. पाली चर्मकार वाडा) हा घराजवळील दुकानात सामान आणण्यासाठी गेला असता, कुत्र्याने हल्ला केला. याशिवाय पाली येथील आर्यन यादव(४), साक्षी यादव (६), शरीफ बेनसेकर (६५), भागवत गुप्ता (५५) हर्ष नितीन पालकर(१४) मंगेश बा. दळवी (१५) यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. पिसाळलेल्या कुत्र्याने मंगळवारी माणसाबरोबरच पाळीव जनावरांवरही हल्ला केला आहे. (वार्ताहर)
पालीत पिसाळलेल्या कुत्र्याने सर्वांचीच झोप उडवली आहे. त्याला पकडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून शहरातील भटक्या कुत्र्यांचाही लवकरच बंदोबस्त करण्यात येणार आहे.
- जनार्दन जोशी, सरपंच, पाली
पालीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून ते नागरिकांच्या अंगावर धावून जातात. रात्रीच्या वेळी के कुत्रे दुचाकीस्वारांच्याही मागे लागतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पालीतील बाजारपेठ, शासकीय कार्यालये,शाळा, बसस्थानक परिसरात जवळपास दीडशे ते दोनशे भटके कुत्रे आहेत. त्यांच्या बंदोबस्त न केल्यास, एखाद्याला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे.
- श्रेयश भालेराव,
ग्रामस्थ, पाली