भाजपाला हव्यात १०६, सेना म्हणते ७५ देऊ
By admin | Published: January 15, 2017 04:49 AM2017-01-15T04:49:33+5:302017-01-15T04:49:33+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत युतीमध्ये १०६ जागांची मागणी भारतीय जनता पार्टीने शिवसेनेकडे केली असून, शिवसेना मात्र ७५पेक्षा एकही जागा जास्त द्यायला तयार नाही.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत युतीमध्ये १०६ जागांची मागणी भारतीय जनता पार्टीने शिवसेनेकडे केली असून, शिवसेना मात्र ७५पेक्षा एकही जागा जास्त द्यायला तयार नाही. त्यामुळे सध्या तरी युती होणे किचकट दिसत आहे. एका सर्वेक्षणाचा आधार घेत १०५ ते ११५ जागा स्वबळावर मिळू शकतात, असे पुढे आल्याने शिवसेनेला स्वबळाचे धुमारे फुटले आहेत.
शिवसेनेने डिसेंबरच्या अखेरीस केलेल्या सर्वेक्षणात शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते, असा निष्कर्ष आहे. भाजपा स्वबळावर लढल्यास त्यांना ७० ते ८० जागा मिळू शकतात. युती केल्यास सेनेला ८० ते ९० आणि भाजपाला ५० ते ६० जागा मिळू शकतात, असे हे सर्वेक्षण सांगते. अर्थात हे सर्वेक्षण सेनेने केले आहे. मनसे व राष्ट्रवादी प्रत्येकी १० व काँग्रेस ४० पर्यंत, असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे.
तरीही दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत सोमवारी चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडून याबाबत घोषणा झालेली नाही. चर्चेमध्ये शिवसेनेकडून सुभाष देसाई, खा. अनिल देसाई आणि आ. अनिल परब तर भाजपाकडून विनोद तावडे, प्रकाश महेता आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार हे सहभागी होतील. चर्चेचे ठिकाण ठरलेले नाही.
या चर्चेत जागावाटपासह महापौरपदही अडीच वर्षांसाठी आपल्याकडेच ठेवण्याची आग्रही भूमिका भाजपा घेण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)
- भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात मात्र स्वबळावर लढल्यास भाजपाला सर्वाधिक १०० जागा मिळतील, असे म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशी सर्वेक्षणे पुढे करीत आहेत.