भाजपचे १६ विद्यमान आमदार वेटिंगवर! ७९ आमदारांना पुन्हा संधी, एका आमदाराचा पत्ता कट
By दीपक भातुसे | Published: October 21, 2024 12:59 PM2024-10-21T12:59:48+5:302024-10-21T13:06:38+5:30
पहिल्या यादीत स्थान नसल्याने तिकीट कापले जाण्याची भीती
दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भाजपने रविवारी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत विद्यमान १६ आमदारांच्या मतदारसंघात उमेदवारी जाहीर न करता या आमदारांना वेटिंगवर ठेवले आहे. त्यामुळे आपले तिकीट कापले जाणार अशी भीती या आमदारांना आहे. यात काही आमदारांना मतदारसंघातून विरोध होत असल्याने तर काही ठिकाणी आमदारांची कामगिरी सुमार असल्याने त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. विद्यमान ७९ आमदारांना भाजपने पहिल्या यादीत स्थान दिले असून एका विद्यमान आमदाराचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर ४ विद्यमान आमदारांऐवजी त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूर मध्य मतदारसंघातील आमदार विकास कुंभारे यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. या मतदारसंघात हलबा मतदारांचे वर्चस्व असून इथून हलबा समाजाचे असलेले विधानपरिषद आमदार प्रवीण दटके इच्छुक आहेत. आर्वीचे आमदार दादाराव केचे यांचे नावही यादीत नसून या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखेडे हे मागील अनेक महिन्यांपासून तयारी आणि प्रचार करत आहेत.
गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कामगिरीवर पक्षात नाराजी असून लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजप उमेदवाराला आघाडी मिळाली नव्हती. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या कामगिरीबाबतही नाराजी असल्याने त्यांचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. याशिवाय वाशिमचे लखन मलिक, उमरखेडचे नामदेव ससाणे यांचीही नावे पहिल्या यादीत नाहीत.
नाशिक मध्य मतदारसंघातही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. इथे देवयानी फरांदे विद्यमान आमदार आहेत. माजी स्थायी समिती सभापती सुरेश अण्णा पाटील यांना उमेदवारी हवी आहे. लोकसभेत सोलापूर मतदारसंघातून पराभूत झालेले विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीला स्थानिक पदाधिकारी विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांचे नाव यादीत आलेले नाही. याशिवाय पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, गेवराई लक्ष्मण पवार, खडकवासला भीमराव तापकीर पेणचे रवीशेठ पाटील या आमदारांना कामगिरीच्या मुद्द्यावर वेटिंगवर ठेवण्यात आल्याचे समजते.
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली होती. भाजपने पहिल्या यादीत या मतदारसंघातही उमेदवार दिलेला नाही.
दोन रिक्त जागांवर उमेदवारी कुणाला?
- अकोला पश्चिमचे गोवर्धन शर्मा व कारंजाचे आमदार राजेंद्र पाटनी यांच्या निधनाने आणि इथे पोटनिवडणूक न झाल्याने या जागा रिक्त होत्या.
- अकोला पश्चिममध्ये गोवर्धन शर्मा यांचा मुलगा कृष्णा शर्मा इच्छुक असून इथे घरात उमेदवारी द्यायची की दुसऱ्याला संधी द्यायची याचा निर्णय होत नाही.
- कारंजा मतदारसंघातही तोच मुद्दा आहे. राजेंद्र पाटनी यांचा मुलगा ग्यायक पाटनी हे इच्छुक असून मुलाला उमेदवारी द्यायची की दुसऱ्याला याचा निर्णय पक्षाने घेतलेला नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघातही भाजपने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
पहिल्या यादीत १३ महिला
पहिल्या यादीत १३ महिलांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यात श्रीजया अशोक चव्हाण (भोकर), अनुराधा चव्हाण (फुलंब्री), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा) ही चार नवीन नावे आहेत. विद्यमान ९ महिला आमदार श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जितूर), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), मनिषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव), नमिता मुंदडा (केज) पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.