भाजप : १४ टक्के मतांच्या वाढीवर ७६ जागा पदरात; काँग्रेस : ४ टक्के मते घटली अन् ४० जागा गमावल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:07 AM2019-08-31T05:07:00+5:302019-08-31T05:07:28+5:30

विधानसभा निवडणूक २०१४ : शिवसेनेच्या १९ जागांत वाढ, तर राष्ट्रवादीचे २१ जागांवर पाणी

BJP: 76 seats on 14 percent vote growth; Congress: 4 percent votes lost and 40 seats lost! | भाजप : १४ टक्के मतांच्या वाढीवर ७६ जागा पदरात; काँग्रेस : ४ टक्के मते घटली अन् ४० जागा गमावल्या!

भाजप : १४ टक्के मतांच्या वाढीवर ७६ जागा पदरात; काँग्रेस : ४ टक्के मते घटली अन् ४० जागा गमावल्या!

Next

नंदकिशोर पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदींच्या त्सुनामिमुळे देशभरात काँग्रेस पक्षाची वाताहात झाली, परंतु सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रात झाले. राज्यातील काँग्रेस खासदारांची संख्या १७ वरून थेट दोनवर आली. शिवाय, सलग पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या या पक्षाला पायउतार व्हावे लागले. एखाद्या राजकीय लाटेत मतांची टक्केवारी आणि जागांचे गणित कसे बिघडून जाते, ते २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले.


सार्वत्रिक निवडणुकीचे गणित नेहमीच सरासरी मतांवर अवलंबून असते असे नाही. महाराष्ट्रातील मागील दोन विधानसभा (२००९-२०१४) निवडणुकीतील पक्षनिहाय मिळालेली मते आणि जागांचे विश्लेषण केले असता निवडणूक आकडेवारी शास्त्राला (शेफॉलॉजी) अभिप्रेत नसलेले निष्कर्ष हाती लागतात. २००९ च्या तुलनेत काँग्रेस पक्षाला अवघी ३.६ टक्के मते कमी पडली; मात्र एवढ्याशा घटीने या पक्षाला तब्बल ४० जागा गमावाव्या लागल्या. या उलट शिवसेनेच्या मतांत २ टक्क्यांची घट होऊनही या पक्षाला १९ जागांचा फायदा झाला. विशेष म्हणजे २०१४ साली भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.


युती न करता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय भाजप-सेनेच्या पथ्यावर पडला. तसा आघाडी न करण्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला. असे का झाले, याची काही कारणं आहेत. एक, केंद्रातील मोदी सरकारचा फायदा भाजपला झाला. दोन, २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेनेच्या मतांवर मोठा डल्ला मारला होता; तो ‘राज’करिश्मा २०१४ च्या निवडणुकीत दिसून आला नाही. परिणामी, सेनेची व्होट बँक शाबुत राहिली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईतील तब्बल १९ जागांवर पाणी सोडावे लागले.

विदर्भाने दिली भाजपला साथ
आजवर काँग्रेसच्या पाठिशी राहाणाऱ्या विदर्भाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकमुखी साथ दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विदर्भाने भाजपच्या पदरात ४३ जागा दिल्या. २००९ च्या तुलनेत तब्बल ३४ जागांची वाढ झाली. या उलट काँग्रेस पक्षाने विदर्भातील १४ तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा गमावल्या. शिवसेनेलाही ३ जागांवर पाणी सोेडावे लागले.

मुंबईत सेनाच मोठा भाऊ!
मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न शिवसेनेने धुळीला मिळवले, शिवाय मुंबई, ठाणे आणि कोकणात २८ जागा जिंकून कोकण किनारपट्टीत आणि मायानगरीत आपणच मोठा भाऊ असल्याचे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध करून दाखवले. भाजपला २४ जागा मिळाल्या. मात्र, कोकणात त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या उलट काँग्रेस (१४) आणि राष्टÑवादीला (५) या विभागातील १९ जागांवर पाणी सोडावे लागले.

प. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची हार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात गत विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, विजयसिंह मोहिते-पाटील (भाजपमध्ये जाण्यापूर्वी) असे दिग्गज नेते असतानाही राष्टÑवादी काँग्रेस २४ जागांवरून १९ जागांवर आला. बारामतीला लागून असलेल्या दौंड मतदारसंघात रासपचे राहुल कुल निवडून आले. याच आ. कुल यांच्या पत्नी रंजना कुल यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते.

Web Title: BJP: 76 seats on 14 percent vote growth; Congress: 4 percent votes lost and 40 seats lost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.