भाजपाकडूनही घराणेशाहीलाच बळ, उमेदवारांना मिळालं 'पूर्व पुण्याई' फळ
By महेश गलांडे | Published: March 21, 2019 10:40 PM2019-03-21T22:40:34+5:302019-03-21T23:34:58+5:30
भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली.
मुंबई - भाजपाने आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावे प्रामुख्याने घोषित करण्यात आली. त्यामध्ये 14 विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली असून यातून भाजपानेही घराणेशाहीलाच बळ दिल्याचे दिसून येत आहे. किंबहुना, या तरुण उमेदवारांना पूर्व पुण्याईचं फळ मिळाल्याचं भाजपाच्या पहिल्या उमेदवार यादीवरुन जाहीर होत आहे. कारण, भाजपाकडून 16 उमेदवारांच्या यादीत पुन्हा एकदा ज्येष्ठ नेत्यांच्याच मुलांना संधी देण्यात आली आहे.
भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. या 16 उमेदवारांमध्ये दोन नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात, नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर लातूरमध्ये डॉ. सुनिल गायकवाड यांऐवजी सुधाकर शृंगारे यांना संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसची घराणेशाही पुढे भाजपातही जोपासण्याचं काम येथे झाल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर, आज भाजपाच्या पहिल्याच यादीत त्यांच नाव जाहीर करण्यात आलं आहे.
तसचे, बीडमधून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या खासदार प्रितम मुंडेंना, नंदूरबार लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून काही वर्षांपूर्वी भाजपात आलेले विजयकुमार गावित यांच्या कन्या विद्यमान खासदार हिना गावित यांना, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांना भाजपाने मुंबई उत्तर-मध्य येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाने जाहीर केलेल्या 16 उमेदवारांपैकी 05 उमेदवार हे घराणेशाहीचीच परंपरा जपणारे असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे नेहमीच काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपानेही तीच 'री'.. ओढल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, भाजपाच्या पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाचा समावेश आहे. तसेच, रावसाहेब दानवे, सुभाष भामरे, हंसराज अहिर याही दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
भाजपाकडून सुजय विखेंचा 'जय', 'या' दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट https://t.co/j1i4lm57d8
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 21, 2019
भाजपाच्या 16 लोकसभा उमेदवारांची नावे
महाराष्ट्र प्रदेश
नागपूर – नितीन गडकरी
नंदुरबार – हिना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर – रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई नॉर्थ – गोपाळ शेट्टी
मुंबई नॉर्थ सेंट्रल – पूनम महाजन
नगर – सुजय विखे
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव श्रृंगारे
सांगली – संजयकाका पाटील
चंद्रपूर - हंसराज अहिर