एमआयएम, भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू : नसीम खान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 07:27 AM2021-12-13T07:27:29+5:302021-12-13T07:27:51+5:30

निवडणूक आल्यावर एमआयएमला मुस्लीम आरक्षण आठवते, निवडणूक संपली की यांना आरक्षण आठवत नाही, नसीम खान यांचा आरोप.

BJP And AIMIM Are Two Sides Of Same Coin Maharashtra Congress Leader Naseem Khan | एमआयएम, भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू : नसीम खान

एमआयएम, भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू : नसीम खान

googlenewsNext

मुंबई : एमआयएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात पाच टक्के आरक्षण दिले. न्यायालयाने ते मान्य केले तरी नंतरच्या काळातील फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. एकीकडे काँग्रेस आरक्षणासाठी संघर्ष करत असताना एमआयएमचे आमदार मात्र विधानसभेत अवाक्षरही काढत नव्हते, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी रविवारी केला.

काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला दिलेले पाच टक्के आरक्षण न्यायालयाने मान्य केले होते. पण, नंतर सत्तेत आलेल्या भाजपने त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यावेळी काँग्रेस पक्ष संघर्ष करत होता. मात्र, एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते, परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लीम आरक्षणावर गप्प का बसले होते. त्यांनी फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही, असा प्रश्न नसीम खान यांनी उपस्थित केला आहे. मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमने मुंबईत सभा घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर खान यांनी एमआयएमला प्रश्न केला.

निवडणूक आल्यावर एमआयएमला मुस्लीम आरक्षण आठवते, निवडणूक संपली की यांना आरक्षण आठवत नाही. भाजप आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून सत्तेचे राजकारण करणाऱ्या भाजपला एमआयएम साथ देत असते. एमआयएमची भूमिका ही नेहमीच भाजपला अनुकूल राहिली आहे, असेही नसीम खान म्हणाले.

मुंबई महापालिकांसह राज्यभरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर ओवेसींना मुस्लिमांचा विकास आणि आरक्षण आठवले. आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी त्यांच्या पक्षाने मुस्लीम समाजासाठी काय केले, याचा हिशेब द्यावा, असे नसीम खान म्हणाले.

Web Title: BJP And AIMIM Are Two Sides Of Same Coin Maharashtra Congress Leader Naseem Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.