शिवसेना, भाजपनं एकत्र यावं हीच इच्छा, पण...; विक्रम गोखलेंनी बोलून दाखवली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 12:35 PM2021-11-19T12:35:09+5:302021-11-19T12:37:09+5:30
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंकडून वादग्रस्त विधानांबद्दल स्पष्टीकरण
मुंबई: शिवसेना, भाजपनं एकत्र यायला हवं ही इच्छा ज्येष्ठ नेते विक्रम गोखलेंनी आज पुन्हा बोलून दाखवली. विक्रम गोखलेंनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झाला. त्यावरून गोखलेंनी स्पष्टीकरण दिलं. शिवसेना, भाजपनं एकत्र यायला हवं. ती काळाची गरज आहे. पण शिवसेना, भाजपनं एकत्र आल्यास काय होईल याची भीती स्युडो सेक्युलर लोकांना वाटते, असं विक्रम गोखले म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना, भाजपनं युतीची घोषणा केली. तेव्हा लहान भाऊ, मोठा भाऊ सुरू होतं. एक ध्येय समोर ठेवून, त्यासाठी प्रेरित होऊन काम करणाऱ्या या दोन्ही पक्षांना मतदारांनी निवडून दिलं. मात्र निवडणुकीनंतर अनपेक्षित घडामोडी घडल्या. त्याची कल्पना कोणीही केली नव्हती. तो एक प्रकारचा मतदारांचा विश्वासघात होता, अशी भावना गोखलेंनी बोलून दाखवली.
शिवसेना, भाजपमध्ये फार मोठी माणसं होऊन गेली. त्यांची भाषणं ऐकत मी मोठा झालो. माझे काही नातेवाईक या पक्षांत होते, अजूनही आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांकडून काही चुका झाल्या. मात्र या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं असं मला आजही वाटतं. तशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सर्वसामान्य माणूस केवळ इच्छा व्यक्त करू शकतो. त्यापलीकडे जाऊन तो काहीही करू शकत नाही. कारण मतपेटीचं राजकारण वेगळंच असतं, असं गोखले यांनी म्हटलं.