‘मारू घाटकोपर’ नामफलकावरून भाजप संतप्त, पुनर्स्थापनेची मागणी; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली होती तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 01:39 PM2023-10-10T13:39:58+5:302023-10-10T13:41:51+5:30
घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या ‘मारू घाटकोपर’ हे गुजरातीमधील नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून टाकले होते.
मुंबई : घाटकोपर येथील चौकातील ‘मारू घाटकोपर’ या गुजराती भाषेतील नामफलकाचे पुनर्स्थापन करावे, अशी मागणी भाजपने सहायक आयुक्तांकडे केली आहे. घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या ‘मारू घाटकोपर’ हे गुजरातीमधील नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून टाकले होते.
वर्षानुवर्षे या शहरात गुजराती आणि मराठी बांधव गुण्या-गोविंद्याने राहत असतात. मनसे आणि शिवसेना भाषावाद निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण करत आहे, असा आरोप भाजपचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला. २०१६ साली या चौकाचे नूतनीकरण करण्यात आले. या चौकात तीन भाषेत नामफलक आहेत.
इतकी वर्षे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा सामाजिक संस्थेने विरोध केलेला नाही, मग आताच ‘मारू घाटकोपर’ नामफलकाची मोडतोड करण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला. गुजराती भाषिकांची लक्ष्मी आणि मराठी भाषिकांची सरस्वती एकत्र येऊन मुंबईचा विकास करत आहे, असे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका भाषणात शिवसैनिकांना संबोधित करताना म्हटले होते. त्यांचे हे उद्गार शिवसैनिक विसरले की काय, असा सवालही त्यांनी केला. २०१६ साली या चौकाचे नूतनीकरण करण्यात आले. या चौकात तीन भाषेत नामफलक आहेत.