ही तर तुमच्या कर्माची फळे, खापर इतरांवर फोडू नका; भाजपानं उद्धव ठाकरेंना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:52 AM2022-10-10T10:52:01+5:302022-10-10T10:52:49+5:30
राज्यातील जनता महामारी, अतिवृष्टी, वादळामुळे हतबल झाली असताना भ्रष्टाचारी मंत्र्यांना प्रोत्साहन दिलेत आणि सत्तेचे सोने करून महाराष्ट्राला मोठे करण्याऐवजी घरात बसून स्वतःभोवती आरती ओवाळणाऱ्यांची टोळी तयार केलीत असा आरोप भाजपानं उद्धव ठाकरेंवर केला.
मुंबई - स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय असं सांगत गेल्या २१ जूनला किशोरी पेडणेकरांना अश्रु अनावर झाले होते. बाळासाहेबांचे अजूनही लक्ष आहे यावर किशोरीताईंचा विश्वास होता. तुमचाही नक्कीच असेल. म्हणूनच, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाची वाताहत झाल्याचे खापर इतरांवर फोडू नका. ही तुमच्याच कर्माची फळे आहेत. तुम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ कॉंग्रेसच्या दावणीला बांधला अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
केशव उपाध्ये यांनी म्हटलंय की, राष्ट्रवादीपुढे गुडघे टेकले. बाळासाहेबांना कधीच मान्य नसलेली सत्तेची पदे स्वतःकडे घेतलीत आणि हिंदुत्वाला लाज वाटणाऱ्या पालघर साधू हत्याकांडावर मौन पाळले. कॉंग्रेसकडून होणारा सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन केलात. सत्तेच्या कैफात स्वाभिमानी आणि निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दहशतवाद्यांशी साटेलोटे असलेल्या नवाबाच्या मांडीला मांडी लावून बसलात. राज्यातील जनता महामारी, अतिवृष्टी, वादळामुळे हतबल झाली असताना भ्रष्टाचारी मंत्र्यांना प्रोत्साहन दिलेत, आणि सत्तेचे सोने करून महाराष्ट्राला मोठे करण्याऐवजी घरात बसून स्वतःभोवती आरती ओवाळणाऱ्यांची टोळी तयार केलीत असा खोचक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.
तसेच ज्या दिवशी शिवसेना कॉंग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी मी हे दुकान बंद करेन असं बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हा तुम्ही खूप लहान होतात. पण बाळासाहेबांची तीच भावना कायम होती. आजही बाळासाहेबांचे शिवसेनेवर लक्ष आहे. त्या दिवशी त्यांच्या स्मृतीस्थळावरची ज्योत थरथरली तेव्हाच हे स्पष्ट झाले असे तुम्ही मानत असाल, तर शिवसेनेची वाताहत ही बाळासाहेबांनी तुम्हाला दिलेली शिक्षा आहे असे समजा. कॉंग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला. म्हणून त्यांच्या इच्छेमुळेच तुमचे दुकान बंद होत आहे, म्हणून जे काही घडत आहे, त्याला तुम्हीच जबाबदार आहात असंही भाजपानं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी केली होती टीका
निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, शिवसेनेचे नाव गोठवले आणि चिन्हही गोठवले. शिवसेना प्रमुख ज्या निवडणूक चिन्हाची धनुष्यबाणाची पूजा करत होते, तो धनुष्यबाण आजही त्यांच्या देव्हाऱ्यात आहे. पण चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाणही गोठवला. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेले रक्तच हवे. कारण शिवसेना म्हटले, की सळसळते आणि तापलेले रक्त. गोठलेल्या रक्ताची येथे गरजच नाही. उलट्या काळजाची माणसं, जी आज फिरत आहेत. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला. त्या आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली. अशा या उलट्या काळजाच्या माणसांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवले. या मागे जी महाशक्ती आहे, त्यांनाही आनंद होत असेल, की बघा आम्ही करून दाखवले. कशी ही माणसं, काय मिळवलं तुम्ही? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपावर हल्लाबोल केला.