Aditya Thackeray vs BJP: "होऊ दे दूध का दूध, पानी का पानी..."; थेट आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 08:17 PM2022-10-31T20:17:30+5:302022-10-31T20:19:40+5:30
"आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद ऐकून पेंग्विननेही डोक्याला हात मारला असता"; भाजपाने उडवली खिल्ली
Aditya Thackeray: "महाविकास आघाडीने खरंच अडीच वर्षात राज्यात प्रकल्प यावे म्हणून तुम्ही प्रयत्न करून प्रस्ताव आणले असतील, यावर तुम्ही ठाम असाल तर माझ्या या मागणीला समर्थन करा. या अडीच वर्षाच्या काळामध्ये नेमके किती प्रस्ताव आले? किती कोटींचे आले? कुठल्या कुठल्या टप्प्यावर ते होते. ते प्रत्यक्षात सुरू झाले का? सुरू नाही झाले? या सगळ्याची अडीच वर्षाच्या काळातील निवृत्त मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी...होऊ दे दूध का दूध पानी का पानी..," असे खुले आव्हान भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिले. आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला.
"पेंग्विनसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची आजची पत्रकार परिषद ऐकून पेंग्विनने डोक्याला हात मारला असता. आदित्यजी, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद आणि प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा धरत आहात हे विसरलात का? अडीच वर्ष तुमचे वडील मुख्यमंत्री होते. त्यांनी ना विधानसभेत एका प्रश्नाचे उत्तर दिले, ना विधानसभेच्या बाहेर कधी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय आणि दुसरे कोणी मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय या पद्धतीच्या भूमिकेवर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता," असा खोचक टोला त्यांनी लगावला.
"आम्ही तर माननीय उद्धव ठाकरेंच्या अशा मुलाखती ऐकल्या की ज्यामध्ये नवाब मलिक विषयावर प्रश्न विचारू नका तरच येतो अशाही मुलाखती आम्ही पाहिल्या. मग अशा बाबतीतील गोष्टी स्पष्ट केल्यावर पेंग्विनला हसे येईल म्हणून आदित्यजी असे वायफळ प्रयत्न करू नका. बल्क ड्रग पार्क या प्रकल्पासाठी दिल्लीत जाणे आवश्यक होते. आदित्यजी तुम्ही आणि तुमचे सहकारी सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींना भेटलेले आम्ही पाहिले पण या प्रस्तावासाठी तुम्ही एकही भेट केंद्र सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांशी किंवा प्रधानमंत्री कार्यालयाशी केलेली दिसलेली नाही. स्वतःचे सरकार वाचवण्यासाठी मात्र पुढे अग्रेसर, मात्र, राज्यातील आपल्या मुलांच्या नोकऱ्यासाठी कदमताल करतायत. या पद्धतीने राज्य अडीच वर्ष चालल्यामुळे आजची राज्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यात राज्याची बदनामी केवढी? तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय? आदित्यजी तुम्ही मनसुख हिरेनलालचा खून विसरलात का? याच राज्यातील मुंबई शहरात राहणाऱ्या एका मोठ्या उद्योजकाच्या घरासमोर स्फोटकांची गाडी या सगळ्यातून काय संदेश दिला जातो. व्यवसायिकाकडून खंडणी गोळा करण्यासाठी वाझे ते तत्कालीन गृहमंत्री हे तुमच्या दिमतीला होते. याच राज्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपतीच्या घरावर स्फोटक लागली जातात. पोलिसांचे अधिकारी वसुलीचे काम करतात आणि सामान्य माणसाचा खून होतो. उद्योग येतील कसे? त्यावेळेला तुमच्या कुकृत्याने तुम्ही उद्योग येऊ दिले नाहीत. आताच्या तीन महिन्यात प्रयत्न करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला त्यावेळच्या कुकृत्याने आणि आताच्या कुप्रचाराने तुम्ही उद्योग येवू देत नाही आहात", अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली.
"वेदांत फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन यामध्ये फरक करून तुम्ही भ्रम फैलावण्याचा प्रयत्न करत आहात. कदाचित ऑर्थर रोडमधून कदाचित भ्रम फैलवणारी विद्या कशी आत्मसात केली? जेलमधून आपल्याला पत्र आले होते का? आमची तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आहे. फॉक्सकॉन वेंदातचा प्रश्न असेल तर आमच्याकडेही पत्र आहे. तर वेंदातचे अनिल अगरवाल यांनी स्वतः १४ सप्टेंबरला केले आहे की, आम्ही गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये दोन वर्षापासून जागा शॉर्टलिस्ट केल्या होत्या. त्याबाबत प्रयत्न करत आहोत. पुढे अग्रवाल असे म्हणतात की, गुजरातने दिलेला प्रस्ताव जास्त सवलतीचा होता आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच भागामध्ये अजून प्रस्ताव घेवुन येत आहोत. स्वतः वेदांतचे मालक जे सांगतात त्यापेक्षाही वेगळं जर तुम्ही सांगत असाल तर पेंग्विनलाही हसवण्याचा हास्य खेळ तुमच्या पत्रकार परिषदेला म्हणायचे नाही तर काय म्हणायचे?" असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना विचारला.
"या सगळ्यातून सत्य दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. अडीच वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते; महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार होते. त्या काळामध्ये जे प्रस्ताव आणि उद्योग गेले म्हणून तुम्ही जो भ्रम आणि खोटे पसरवत आहात ते मुळात आले कधी? याचे एकही डॉक्युमेंट तुम्ही दाखवत नाही. एकदा मी डाओसला गेलो म्हणजे माझे आकाशाला हात लागले...म्हणजे मी, बोलेन ते सत्य... माझ्यासमोर मला वाटेल तेच बोलणारा आला पाहिजे.. या वृत्तीतून राज्यकारभार चालत नसतो. त्यामुळे उद्धवजीनी चालवलेले सरकार आणि आदित्यजीनी मांडलेली भूमिका याचे वर्णन अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र असेच करता येईल. तत्कालीन मुख्यमंत्री कधी कोणाला भेटले, बोलले नाहीत, पत्रकार परिषदा केल्या नाहीत. ते अहंकारातून म्हणजे अहंकारी राजा... आदित्यजी म्हणजे मला सुचतं ते खरं, एकदा डाओसला जाऊन आलो की, आभाळाला हात लागले. हाजी हाजी करणारे समोर आहेतच... त्यामुळे विलासी राजपुत्र ठरतो. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र कशा पद्धतीने चालत नाही. माझी तर पुन्हा एकदा मागणी आहे. खरेच अडीच वर्षात तुम्ही प्रयत्न करून प्रस्ताव आणले असतील, यावर तुम्ही ठाम असाल तर माझ्या या मागणीला समर्थन करा. या अडीच वर्षाच्या काळामध्ये नेमके किती प्रस्ताव आले? किती कोटींचे आले? कुठल्या कुठल्या टप्प्यावर ते होते. ते प्रत्यक्षात सुरू झाले का? सुरू नाही झाले? या सगळ्याची अडीच वर्षाच्या काळातील माजी मुख्य न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी...होऊ दे दूध का दूध पानी का पानी..." असे शेलार म्हणाले.