Ashish Shelar : "ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्यात जातो, सत्तेची लालसा एवढी होती की..."; भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 02:27 PM2022-07-26T14:27:27+5:302022-07-26T14:39:43+5:30
BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेमुळे भाजपा नेते आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला असून त्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेमुळे भाजपा नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्रेलर दणक्यात असतो, पिक्चर डब्यात जातो असा खोचक टोला देखील शेलार यांनी मुलाखतीवर लगावला आहे.
आशिष शेलार यांनी "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान आहे" असं म्हटलं आहे. तसेच "मुख्यमंत्र्यांना घालून पाडून बोलणं, अपमानित करणं हे महाराष्ट्राला मान्य नाही. यावर सुप्रिया सुळे काही बोलणार आहेत का? हा महाराष्ट्रद्रोह होत नाही आहे का?" अशी विचारणा शेलार यांनी केली आहे. "तुमची सत्तेची लालसा एवढी होती की, आजारी असताना एका दिवसासाठी सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री पदाचा पदभार कुणाला दिला नाही" अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"उद्धवजी तुम्ही सतेत असताना जसे वागलात, तसे आम्ही अजिबात वागणार नाही. तुम्ही मुख्यमंत्री असताना जो तुम्हाला प्रश्न विचारेल त्याच्या घरात घुसून तुम्ही मुंडण करत होतात. जो सोशल मीडियावर तुम्हाला अनपेक्षित गोष्टी बोलेल त्यांच्या सोसायटीत जाऊन त्यांचे डोळे फोडले होते. जे पत्रकार, संपादक सरकारी धोरणाविरोधात बोलले, त्यांना घरातून अटक केली आहे. आज आम्ही असे वागणार नाही. पण तुम्ही जर आज मुख्यमंत्री असता आणि कोणी तुमचा सामनाच्या मुलाखतीत आहे तसा उल्लेख केला असता, तर तुमचे लवंडे आणि तुमचे कार्यकर्ते कसे वागला असता याचा विचार करा" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
"काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के"
भाजपाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "मागील अडीच वर्षातल्या कर्तृत्वाच्या चार गोष्टी माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या असत्या तर लोकांनाही ऐकायला बऱ्या वाटल्या असत्या… पण तिथे वसूली शिवाय काहीच नव्हतं…" असं म्हणत चित्रा वाघ यांनी बोचरी टीका केली आहे.