Ashish Shelar : "फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा"; भाजपाचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 01:12 PM2022-09-05T13:12:33+5:302022-09-05T13:20:53+5:30
BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत असं म्हणत शिवसेनेने भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. सडक्या मेंदूच्या राज्यकर्त्यांनो, तुम्ही गोधडी भिजवत होता तेव्हापासून शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यांचे सीमोल्लंघन करीत आली आहे. आता काय तर म्हणे त्यांचे 'मिशन मुंबई' सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे 'कमिशन मुंबई' आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. याला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. "फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता…पालिकेच्या मराठी शाळा कोणी बंद केल्या? सचिन वाझेला वसुलीला कोणी बसवले? ख्यातकीर्त डॉ अमरापूरकर यांचा बळी कोणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसले?फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल वाचवा हेच मिशन सुरू आहे, त्याचे काय?" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा!@BJP4Mumbaipic.twitter.com/LmRWLM4Vjq
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 5, 2022
"मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले?"
"मराठी माणसात फूट, ही आरोळी 100 टक्के झूट! महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले…तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उद्ध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले? आणि हे वर्षानुवर्ष मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे…आता म्हणे पुढे चला? कुठे वसई की विरार? की आणखी त्याच्यापण पुढे" असं म्हणत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे.
"पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच"
अशिष शेलार यांनी हे मिशन नव्हे कमिशन, कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले. बंधू’राजां’नी वेगळी चूल मांडली. खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले. वाममार्गाने मिळवलेले मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले, तरी पेंग्विन सेनेचे अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच… स्वत:चे अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय, नाचता येईना अंगण वाकडे, स्वत:चे अपय़श झाकायला आता पर्याय तोकडे" असं म्हणत बोचरी टीका केली आहे.