"आदित्य ठाकरेंना लोकसभेला उतरवून निवडून आणून दाखवावं"; शेलारांचं थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 04:34 PM2024-01-13T16:34:32+5:302024-01-13T16:35:07+5:30
BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray : एकनाथ खडसे यांनी केलेले टीकेला देखील आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवा असं थेट आव्हान मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उबाठा गटाला दिलं आहे. आशिष शेलार म्हणाले की, आज सकाळी लवकर उठल्यामुळे त्यांच्या डोळ्यावरची झोप गेली नसावी म्हणून उद्धव ठाकरे यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. संजय राऊत यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट मुद्दाहून अडचणीत आणणारी आणि चुकीची दिलेली असावी.
उद्धव ठाकरे आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या ट्विटर हँडलवर जरी गेले असते तरी त्यांना दिसले असते की, कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे २४ तासांनंतर जागे झाले आहेत. त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोचले आहे. यांनी सांगण्याची काही गरज नाही. यांच्या सांगण्यावरून कुणाला आम्ही निमंत्रण देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेले टीकेला देखील शेलार यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांना तिकडे गेल्यावर स्मृतिभ्रंश झाला असेल माझी त्यांना विनंती आहे, आपण टीका जरूर करा पण त्या टीकेला तथ्य असू द्या असं म्हटलं आहे. कालच्या घटनेचा उल्लेख केला असता शेकडो कोटीच्या कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन विकासाला गती देणारे आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित दादा यांच्या उपस्थितीत झाले आहे.
महायुतीचा मेळावा यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियलमध्ये होईल तर उपनगरातील दुसरा मेळावा रंग शारदातील वांद्रे येथे होईल. महायुतीतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा एकत्रितपणे होईल. मुंबईतील सहाही जागा निवडून आणू यासाठी आम्ही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे स्वतःला घरंदाज, कुटुंबप्रमुख म्हणणार असतील त्यांना माझा सवाल आहे उद्धवजी जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो, जर तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला घरातून बाहेर काढता, जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागते तर तुम्ही कुटुंबप्रमुख आणि घरंदाज कसे? त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका. मोदींचे कुटुंब आणि मोदींचे घर १४० कोटी जनता आहे. स्वतःच्या परिवारापेक्षा देश हा परिवार मानणे ही त्यांची भूमिका आणि माझे कुटुंब माझा परिवार ही तुमची भूमिका कोठे? यासाठी तुम्ही क्लासेस लावावी लागते मी चाटे क्लासेसला याबाबत जरूर विनंती करेन असंही आशिष शेलार म्हणाले.
शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. उद्धव ठाकरे यांचे भाषण त्यांना आलेले नैराश्य दाखवत आहे. कल्याण डोंबिवली शहरात उद्धव ठाकरे (उबाठा) यांच्या पक्षाची एक जागा निवडून आणून दाखवावी. मर्दांचा पक्ष उबाठा असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला लोकसभेला निवडून आणून दाखवावे अशीही टीका आशिष शेलार यांनी केली.