"ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 05:37 PM2023-09-06T17:37:58+5:302023-09-06T17:39:44+5:30
BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंवर आरोप केले, यावर आता माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या सरकारने राजीनामे द्यावेत अशी मागणी केली आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?" असा सवाल विचारला आहे. तसेच "त्यांचे आपले तेच ते सुरू आहे, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, मै घर में बैठता हूं!" असं म्हणत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
उच्च न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देणाऱ्या, पण पोलिसांच्या कारवाईसाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी माफी मागून मनाचा मोठेपणा दाखविला. पण ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 6, 2023
आमची अपेक्षा होती की आज स्वतः ते…
"उच्च न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देणाऱ्या, पण पोलिसांच्या कारवाईसाठी उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी माफी मागून मनाचा मोठेपणा दाखविला. पण ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार? आमची अपेक्षा होती की आज स्वतः ते राज्यपालांना भेटून माझ्या काळात मराठा आरक्षण गेले, मी राज्याच्या तमाम जनतेची माफी मागतो, असे सांगतील. पण त्यांचे आपले तेच ते सुरू आहे, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, मै घर में बैठता हूं!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या सरकारच्या काळात आरक्षण टीकलं नाही, तेव्हा बाकीचे विकेट किपर होते तेव्हा काही का केलं नाही, अजितदादाही आमच्या सरकारमध्ये होते. माझ काय चुकत होतं तेव्हा त्यांनी सांगायला हवं होते. आम्ही कुठेही वकील बदललेले नव्हते. आता महत्वाच म्हणजे त्यावेळचे अपयश मला देत असाल तर आता तुम्ही डोकी फोडली आहेत, त्याची जबाबदारी सगळ्यांनी टीम वर्क म्हणून स्वीकारली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.
"आतापर्यंत मी गृहमंत्र्यांचा राजीमाना मागत होतो, आता टीम वर्क म्हणून या तिघांनीही राजीनामा दिला पाहिजे. हा दोष त्यांच्या टीमचा आहे.एकुणच हे तीन तिघाडी सरकार आहे, ट्रीपल इंजिन न्याय, हक्कासाठी रस्त्यावर यायच नाही, नाहीतर आम्ही मारहाण करु, असंच या सरकारच सुरू आहे. बारसुमध्ये असंच झालं होतं. जबाबदारी कोण घेणार? आदेश कुणी दिला? डोळ्या देखत जर पोलीस न जुमानत वागत असतील तर त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही असा याचा अर्थ होतो त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.