Ashish Shelar : "...आता भोगा आपल्या कर्माची फळं"; भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 10:19 AM2023-07-08T10:19:17+5:302023-07-08T10:29:43+5:30
BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे यामुळे शिवसेनेतील नेते नाराज असल्याच्या सुरू झाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच बोललं जात होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. याच दरम्यान भाजपानेउद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
"हाच स्वभाव नडला आणि कारण नसताना आमचा बाप काढला. आता भोगा आपल्या कर्माची फळं" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुख्यमंत्री राजीनामा देणार!, सरकार पडणार!!, उबाठा मध्ये काही आमदार परत येणार!!!अजित दादांसोबतच्यांची आमदारकी धोक्यात!!! मीडियात अशा अफवा लाखात...पसरवणारे एकच ते महान "विश्वविख्यात". हाच स्वभाव नडला आणि कारण नसताना आमचा बाप काढला. आता भोगा आपल्या कर्माची फळं!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
■ मुख्यमंत्री राजीनामा देणार!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 7, 2023
■ सरकार पडणार!!
■उबाठा मध्ये काही आमदार परत येणार!!!
■ अजित दादांसोबतच्यांची आमदारकी धोक्यात!!!
मिडियात अशा अफवा लाखात...
पसरवणारे एकच ते महान "विश्वविख्यात"
हाच स्वभाव नडला आणि
कारण नसताना आमचा बाप काढला
आता भोगा आपल्या कर्माची फळं!
"विश्वविख्यातांनी काढला नसता बाप तर झाला नसता मालकांना ताप"
"...या प्रस्तुत प्रसंगी "जाणता राजा" हरला नाही, तर तो जिंकला... हे सांगण्यासाठी दरबारी राजकारणात "भाट" ठेवलेले असतातच... वेगवेगळ्या "माध्यमातून" भाट आपलं काम चोख करीत आहेत. विश्वविख्यात प्रवक्ते आणि शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की, हा तर दिल्लीचा डाव..? आमचं पुन्हा पुन्हा एकच म्हणणं जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप!" असं देखीस याआधी आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजितदादा यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. अजितदादा आमच्यात आल्यामुळे शिवसेनेत नाराजी नाही. सरकार आणखी मजबूत झाले आहे. आम्ही नाराज असल्याच्या अफवा विरोधकांकडून करण्यात येत आहेत.तुम्ही तुमच घर बघा, तुमचं घर तर तुटलं आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला.
'आम्हाला गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा आहे, महाविकास आघाडी सरकारने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. जेव्हापासून मी आणि देवेंद्रजी काम करत आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी करत आहे. अफवा पसरवणाऱ्यांची मर्यादा काय आहेत ते बघा, सर्व मर्यादा त्यांनी तोडल्या आहेत. विरोधकांचा जळफळाट होऊन अशा अफवा पसरवत आहेत, असंही शिंदे म्हणाले.