कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या 'उबाठा'चे हात मराठी माणसाच्या रक्ताने माखलेले- आशिष शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 08:40 PM2024-07-15T20:40:57+5:302024-07-15T20:42:09+5:30
Ashish Shelar vs Sanjay Raut: संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून 'हग्रलेख' लिहितात? असाही पोस्टमध्ये केला उल्लेख
Ashish Shelar vs Sanjay Raut: मोदी जिंकले असे म्हणणाऱ्या लोकांनी डोकी तपासून घ्यावीत, कारण कुबड्या काढल्या तर सरकार कोसळू शकते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी खास शैलीत प्रत्युत्तर दिले. आशिष शेलार यांनी ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले आणि टीकेचा खरपूस समाचार घेतला.
"श्रीमान मोरारजी राऊत... महाराष्ट्रात एखादा उद्योग व्यवसाय येणार किंवा नवीन विकास प्रकल्प होणार असे कळताच कट कमिशन आणि राजकीय स्वार्थासाठी हातात विरोधाचा झेंडा घेऊन जे उतारतात, उद्योगांना महाराष्ट्रातून पळवून लावतात, त्याच पक्षाचे नेते संजय राऊत महाराष्ट्रातून उद्योग गेले म्हणून "हग्रलेख" लिहितात?" अशी खोचक टीका शेलारांनी केली.
श्रीमान मोरारजी राऊत ! pic.twitter.com/3e2p5lRnoA
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2024
"आता विषय काढलाच आहे तर मग, संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यावी लागतील. मुंबई सोडून एलएनटी का गेली? कुणाची युनियन होती? महेंद्रा कंपनी मुंबई सोडून अन्य राज्यात का गेली? कुणाची युनियन होती? खंबाटा, एएफएल लॉजिस्टीक यांनी का शटर डाऊन केली? या सगळ्यांना युनियन बनवून कुणी त्रास दिला? ही मुंबईतील काही मोजकी उदाहरणे महाराष्ट्रातील गेल्या १५ वर्षातील उद्योग बंद झाले. त्याचा हिशेब काढला तर मग पुण्याच्या बजाज पासून सगळया कारखान्यांमध्ये उबाठाचीच युनियन होती ना? वेदांत फॉस्कॉन, बारसूची ग्रीन रिफायनरी, वाढवण बंदर या प्रकल्पांना विरोध कोण करतेय ? आणि पुन्हा महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून ओडताय ? चोर तर चोर वरुन शिरजोर?" असे खरमरीत सवाल शेलारांनी राऊतांना विचारले.
"मराठी कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या उबाठाचे हात मराठी माणसाच्या रक्ताने ही माखलेले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणासावर गोळया झाडणाऱ्या स. का. पाटील, मोरारजी देसाई यांच्या काँग्रेसच्या मांडीवर तुम्ही बागडत आहात ना? काँग्रेसशी हात मिळवणी केलीत, तुमच्या हाताला मराठी माणसाचे रक्त लागलेले आहे. तुम्हाला इतिहास कधीच माफ करणार नाही. श्रीमान संजय राऊत तुमचे कसे झालेय सांगू का? दुदैवाने ज्याला वेड लागते म्हणजे तुमच्या सारखा जो मनोरुग्ण असतो त्याला ना "आपण सोडून सगळं जग वेडं वाटत असतं" ...म्हणून तुम्ही मोरारजी राऊत आहात!" अशी बोचरी टीका शेलारांनी केली.