“त्यांचे जेवढे वय, तेवढा माझा राजकीय अनुभव”; अशोक चव्हाणांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 21:07 IST2025-04-14T21:07:12+5:302025-04-14T21:07:26+5:30
BJP Ashok Chavan Replied NCP SP Rohit Pawar: अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि निष्ठा एवढ्या लवकर बदलतात हे बघून आमच्यासारख्या नव्या पोरांना दुःख होते. विधान परिषद, राज्यसभेत जाण्यासाठी मला कोणालाही शरण जावे लागले नाही हे खरे आहे की नाही, तुम्हीच सांगा, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

“त्यांचे जेवढे वय, तेवढा माझा राजकीय अनुभव”; अशोक चव्हाणांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर
BJP Ashok Chavan Replied NCP SP Rohit Pawar: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या धार तीव्र होताना दिसत आहेत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. भाजपा नेते आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केलेल्या एका विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक टीका केली होती, त्या टीकेचा अशोक चव्हाण यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.
राम शिंदे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. हा खूप अवघड मतदारसंघ आहे. मध्यंतरी रोहित पवार यांनी त्या मतदारसंघात बोलावले होते. त्या मतदारसंघात गेलो. मात्र, तिथे लोक माझ्याकडे येऊन माझ्या कानात सांगत होते की, या ठिकाणी खरा माणूस राम शिंदे आहे. म्हणजेच जन माणसाचा राम शिंदेंना पाठिंबा आहे, असे विधान भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते. यावर रोहित पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. यानंतर आता रोहित पवारांनी केलेल्या टीकेला अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले.
राज्यसभेत जाण्यासाठी मला कोणालाही शरण जावे लागले नाही
अशोक चव्हाणजी, विचारधारेशी निष्ठा नसेल तर राजकीय अनुभवाला काहीच अर्थ राहत नाही, ही पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या आमच्यासारख्या नव्या पोरांची आपल्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांकडे तक्रार आहे. बाकी, आपल्याबद्दल कायमच आदर आहे, होता आणि राहील. परंतु, अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि निष्ठा एवढ्या लवकर बदलतात हे बघून आमच्यासारख्या नव्या पोरांना, कार्यकर्त्यांना दुःख होते, बाकी काही नाही! विधान परिषदेवर अथवा राज्यसभेत जाण्यासाठी मला कोणालाही शरण जावे लागले नाही हे खरे आहे की नाही, तुम्हीच सांगा, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.
त्यांचे जेवढे वय, तेवढा माझा राजकीय अनुभव
माझ्या जिल्ह्यात सभापती आले होते. त्यांचा यथोचित सन्मान करणे, त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात वाईट काय? मी त्यांच्याबद्दल चांगले बोललो तर त्यात कोणालाही वाईट वाटण्याचे कारण नाही. तसेच राज्यसभेत जाण्यासाठी शरण जाण्याचा प्रश्नच येत नाही. रोहित पवार कदाचित विसरले असतील की यापूर्वी मी लोकसभेत होते, विधानसभेतही होतो. त्यांचे जेवढे वय आहे तेवढा माझा राजकीय अनुभव आहे.