अण्णांच्या याचिकेमागे भाजपा?
By admin | Published: January 13, 2017 04:04 AM2017-01-13T04:04:57+5:302017-01-13T04:04:57+5:30
ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी
अतुुल कुलकर्णी / मुंबई
ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील कथित घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमागे बोलविते धनी भाजपा नेतेच असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. तर दुसरीकडे चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सरकारविरोधात मूग गिळून असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर थेट आरोप ठेवणारी याचिका अण्णा हजारे यांनी केली खरी; परंतु आधी तक्रार नोंदवा, असे न्यायालयाने बजावले. अलीकडच्या काळात अण्णांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले सूत जमले आहे. त्यातूनच ही याचिका पुढे आल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर याचिका सुनावणीला आली असती, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली असती.
मराठा मोर्चामुळे सरकारविरोधी वातावरण तयार झाले, असे बोलले जात असतानाच नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला. अन्य समाजाच्या लोकांनी मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान केले नाही, असा एक सूर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निघाल्याचे समजते.
मुख्यमंत्री जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत; कारण त्यांना मतांचे ध्रुवीकरण करायचे आहे. दुर्दैवाने आमच्या पक्षात एकही नेता यावर मात करून ठाम भूमिका घेण्यास तयार नाही, सरकारच्या विरोधातबोलण्यासारखे असंख्य मुद्दे असताना आमच्या पक्षाचे नेते कोषात गेल्यासारखे गप्प बसून आहेत. कोणी फार तीव्रतेने मुद्दे मांडायला तयार नाही, सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकायला तयार नाही, कारण प्रत्येकाला आपल्या विरोधात चौकशीचे शुक्लकाष्ठ लागेल की काय, याची भीती आहे, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अनुकूल आहेत. पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यापीठावर शरद पवार पुण्यात दोन वेळा एकत्र आल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे.
निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार रणनीती आखलेली असताना, दुसरीकडे आपापले गड कसे सांभाळायचे याच्या पलीकडे राज्याचा एकत्रित विचार कोणाकडेही नाही, अशी खदखद दोन्ही काँग्रेसमध्ये आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. प्रत्येकाला जिल्हे वाटप करून दिले आहेत, कामांचे वाटप सुरू आहे.