उमरखेडमध्ये इच्छुकांची गर्दी; भाजप नेतृत्वासमोर निर्माण होणार पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 03:01 PM2019-07-29T15:01:44+5:302019-07-29T15:04:30+5:30
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षासमोर इच्छुकांची समज काढणे मोठे आव्हान ठरणार आहे.
मुंबई - अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. एकाच पक्षातून अनेकांनी तयारी सुरु केल्याने, सर्वच पक्षांची उमेदवारी देताना दमछाक होणार आहे. उमरखेड मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचे नाव निश्चित समजले जात आहे. मात्र असे असतानाही पक्षातील नेत्यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी मुंबई वाऱ्या सूर केल्याने नजरधनेंची डोकेदुखी वाढली असल्याची चर्चा आहे. तर इच्छुकांची मनधरणी करताना भाजप नेतृत्वासमोर पेच निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षासमोर इच्छुकांची समज काढणे मोठे आव्हान ठरणार आहे. उमरखेड मतदारसंघात तर भाजपमधील नेत्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून थेट मुंबईत फिल्डिंग लावणे सुरु केले आहे. त्यामुळे विद्यामान आमदार यांची डोकेदुखी वाढली आहे.
उमरखेड मतदारसंघ युतीत भाजपकडे आहे. गेल्यावेळी आमदार राजेंद्र नजरधने यांनी काँग्रेसचे विजयराव खडसे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. यावेळी सुद्धा नजरधने यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. मात्र एनेवेळी आता यवतमाळ भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आणि विश्वपाल धुळधुळे यांच्यासह अनेकांनी सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सूर केल्याने, नजरधने यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
विदर्भातील कोणत्याही मतदारसंघात केवळ गडकरी वाड्याशी संबध असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळवण्यात यश येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे उमरखेड मधील भाजपच्या इच्छुकांनी या दृष्टीने हालचाली सूर केल्या आहेत. त्यामुळे यावेळी भाजपची उमेदवारी आमदार नजरधने यांच्याकडे कायम राहणार की, नवीन चेहरा भाजपकडून दिला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.