भाजपावर सेनेचा ‘अवकाळी’ हल्ला!

By admin | Published: March 11, 2015 02:40 AM2015-03-11T02:40:25+5:302015-03-11T02:40:25+5:30

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विधानसभेत शिवसेनेने आज फडणवीस सरकारला कठोर शब्दांत खडे बोल सुनावले

BJP 'attack' attack on BJP! | भाजपावर सेनेचा ‘अवकाळी’ हल्ला!

भाजपावर सेनेचा ‘अवकाळी’ हल्ला!

Next

मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विधानसभेत शिवसेनेने आज फडणवीस सरकारला कठोर शब्दांत खडे बोल सुनावले. त्यामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली. अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील या सेनेच्या आमदारांनी घणाघाती भाषण केल्याने सत्ताधारी बाकांवर बरीच चुळबुळ झाली.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटावर विधानसभेत तातडीने चर्चा घडवून आणण्यासाठी विरोधी पक्षांनी नियम ९७ आणि ५७ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सर्व विषय बाजूला ठेवून चर्चा सुरू
करण्यात अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर भाजपा आमदारांनी २९३ अन्वये याच विषयावर चर्चा आणली.
पण ती शिवसेनेने त्यांच्यावर उलटवली. विशेष म्हणजे या वेळी सभागृहात सेनेचे
वरिष्ठ नेते, मंत्री हजर नव्हते. त्यामुळे शिवसेनेने भाजपाचा हा सुनियोजित ‘कार्यक्रम’ केल्याची चर्चा विधिमंडळात रंगली.
पाच मिनिटांच्या सभात्यागानंतर सभागृहात परत आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही चर्चेत सहभाग घेत सेनेच्या आमदारांना डिवचले. ‘सरकारला कधी जाब विचारणार?’ असा बाण छगन भुजबळ यांनी सोडला आणि तो नेमका सेनेच्या वर्मी लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीने उसाला ६ हजारांचा भाव दिला, तुम्ही त्यांच्यापेक्षा निदान दोनतीनशे रुपये तरी जास्तीचे द्या, कोणत्या तोंडाने आम्ही मतदारसंघात जायचे ते तरी सांगा, अशा शब्दांत आ. खोतकर यांनी सरकारवर हल्ला चढवला; तेव्हा विरोधी सदस्यांनी जोरजोरात बाके वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. सरकारी पक्षाच्या सदस्यांनी आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांचा असा सहभाग पाहून सत्ताधारी बाकावरील सदस्य चिडीचूप बसले होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: BJP 'attack' attack on BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.