“विधिमंडळात शिवसैनिक नाही, आमदार मतदान करतात; खिशातला राजीनामा बाहेर काढा”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:24 PM2022-06-22T23:24:29+5:302022-06-22T23:25:14+5:30
बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली, अशी विचारणा भाजपने केली आहे.
मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. दिवसभरातील घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले होते. यानंतर भाजपसह अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. खिशातला राजीनामा बाहेर काढा, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर, गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असे ४ मुद्द्यांचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केला. याशिवाय या ट्विटला हिंदुत्व फॉरेव्हर असा हॅशटॅगही जोडला. एकनाथ शिंदेंची भूमिका पाहता, उद्धव ठाकरे यांनी साद बंडखोर आमदारांना अमान्य असून, पक्ष प्रमुखांचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.
खिशातला राजीनामा बाहेर काढा
बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली? विधिमंडळात शिवसैनिक नाही आमदार मतदान करतात. पुरे झालं, जनता विटली आहे, खिशातला राजीनामा बाहेर काढा आता, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच दुसरीकडे, एकीकडे शिवसेना-भाजप युतीचे आवाहन करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि त्याच्या कार्यशैलीवर जोरदार टीकास्त्र सोडताना पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले धंदे, त्यांचे नाव आहे एकनाथ शिंदे, या शब्दांत रामदास आठवले यांनी चिमटा काढला.