“मोदींच्या फोटोशिवाय उद्धव ठाकरे लोकसभा जिंकू शकत नाही, ही खात्री सूज्ञ खासदारांना आहे”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:13 PM2022-07-02T14:13:43+5:302022-07-02T14:14:31+5:30
एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याबाबत शिवसेनेतून आता उद्धव ठाकरेंवर दबाव वाढत असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबई:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून, त्या पार्श्वभूमीवर सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल होणार आहेत. यातच आता एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याबाबत शिवसेनेचे खासदार उद्धव ठाकरे यांना आग्रह करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावरून भाजपने जोरदार टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी करत भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सामील झाले. शिवसेनेच्या इतिहासातील आजवरचे हे सर्वात मोठं बंड मानले जात आहे. यातच आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार वेगळा विचार करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटाने शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींच्या फोटोशिवाय लोकसभा जिंकू शकणार नाही
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, मोदीजींचा फोटो बॅनर पोस्टरवर लावल्याशिवाय आपण लोकसभा कधीच जिंकू शकणार नाही याची खात्री असलेले हे सूज्ञ खासदार आहेत, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपाच्या एका केंद्रीय नेत्यानं दावा केला की शिवसेनेतील आमदारांच्या बंडाचे परिणाम खासदारांवरही पाहायला मिळतील. शिवसेनेच्या १९ पैकी कमीतकमी डजनभर खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात आहेत.
दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेंच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांना पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरेंकडे केली. शिवसेना खासदारांच्या बैठकीत तीन खासदार अनुपस्थित होते. यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे. भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेनेचे लोकसभेत एकूण १९ तर राज्यसभेत तीन खासदार आहेत.