Maharashtra Politics: “मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके, घरटीबॅाम्ब… सुरसुरी…”; भाजपची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 02:45 PM2022-10-24T14:45:09+5:302022-10-24T14:46:27+5:30
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून विरोधकांकडून टीका केली जात असून, भाजपनेही खोचक टोला लगावला आहे.
Maharashtra Politics: परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीतील या संकटामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद दौऱ्यावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. मात्र, यावरून उद्धव ठाकरेंवर टीका होताना दिसत आहे. भाजपनेही उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
या निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ अन् केवळ घोषणांची अतिवृष्टी आहे. आसूड फक्त हातात ठेवू नका तो वापरा. सरकारला पाझर फुटत नसेल तर घाम फोडा. आमच्याशी गद्दारी केली, शेतकऱ्यांशी करू नका, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरूनच शिंदे-फडणवीस सरकारवर केली. याला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके, घरटीबॅाम्ब... सुरसुरी...
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये एका फटाक्यांच्या बॉक्स आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे. याला मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके, ॲपटीबार… घरटीबॅाम्ब… सुरसुरी…, असे कॅप्शन देत खोचक टीका केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलासा दिला असता तर येवढे रामायण घडलेच नसते. उद्धव ठाकरे आले. पंधरा मिनिटांचा दौरा केला. सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या घरी चहा पिण्यास गेल्यास किमान वीस मिनिटे लागतात. पण, पंधरा मिनिटांत पाहणी दौरा होत असेल, तर त्यासारखे आश्चर्य नाही, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मविआच्या काळात न फुटलेले
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 24, 2022
घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके,
ॲपटीबार…
घरटीबॅाम्ब…
सुरसुरी… pic.twitter.com/b8a97vHLdC
दरम्यान, उद्धव ठाकरे आता बाहेर पडले. काही ठिकाणी दौरे करू लागलेत. याचे क्रेडिट हे त्यांना स्वतःला जात नाही. याचे क्रेडिट हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांना जाते. कारण अडीच वर्षे ना मंत्रालयात गेले ना राज्यात गेले. घरी बसून कारभार केला, असा टोला केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"