"अडीच वर्षाचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह"; भाजपाचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 07:52 PM2022-06-22T19:52:48+5:302022-06-22T19:59:12+5:30
BJP Atul Bhatkhalkar And Uddhav Thackeray : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत.
मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. हिंदुत्वाच्या मुद्दयावरून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सरकार करावं अशी मागणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होता. पण माझ्या लोकांनाच मी नको. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे माझ्याशी चर्चा करायला हवी होती. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो. उगाच का असं करताय? मी राजीनामा तयार करून ठेवला. या आणि राजभवनात पत्र घेऊन जा, सत्तेसाठी मी लाचार नाही असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले. यानंतर आता भाजपाने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हवर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. "अडीच वर्षाचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "पांचट कोट्यांचा शिल्लक कोटा पूर्ण करतायत बहुधा…" असं ट्विट हे उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच त्यांनी केलं. त्यानंतर फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर "अडीच वर्षाचा प्रवास… फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह" असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. "समोर येऊन राजीनामा मागा, हे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवर सांगतायत" असं देखील म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी "या समोर बसा, मी देतो राजीनामा. जे आमदार गायब आहेत त्यांनी माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनात जावं कारण मला कोरोना झाला आहे" असं म्हटलं आहे. "एकदा ठरवूया, तुम्ही या किंवा तिथून फोन करा आणि सांगा तुमचं आम्ही फेसबुक लाईव्ह पाहिलं. आम्हाला यायला संकोच वाटतो पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नकोत हे स्पष्ट सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे" असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
ज्या शिवसैनिकांना मी शिवसेनेचे नेतृत्व करण्यास नालायक आहे हे मला सांगावं मी पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहे. पण तो खरा शिवसैनिक असावा. मी दोन्ही पद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मी आनंदी आहे. दुसरा मुख्यमंत्री चालत असेल तर मला समोर येऊन सांगा. मला फोन करा, चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. संकोच वाटत असेल या क्षणी मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. पदे येतात आणि जातात, आयुष्याची कमाई पदावर असताना जनतेसाठी जी कामे केली तेच असते असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.