"सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?"; भाजपाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 10:40 AM2022-08-01T10:40:26+5:302022-08-01T10:48:12+5:30

BJP Atul Bhatkhalkar slams Shivsena Sanjay Raut : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

BJP Atul Bhatkhalkar slams Shivsena Sanjay Raut Over ED | "सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?"; भाजपाचा हल्लाबोल

"सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, अटक होताना भगवा गळ्यात कशाला?"; भाजपाचा हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात आले. त्यावेळी संजय राऊत यांनी आपल्या अनोख्या शैलीत निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले. घरातून बाहेर पडल्यानंतर गळ्यातील भगवा गमछा काढून त्यांनी हवेत फिरवला. तसेच घराबाहेरील रस्त्यावरून ईडी कार्यालयात जाताना देखील संजय राऊत यांनी कारच्या सनरुफमधून बाहेर येऊन शिवसैनिक आणि समर्थकांना हात दाखवून आणि पुन्हा गळ्यातील भगवा गमछा फिरवून अभिवादन केले. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा" असं म्हटलं आहे. तसेच यासोबतच दोन फोटो देखील शेअर केले आहेत. सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता आणि अटक होताना भगवा गळ्यात कशाला? असं त्या फोटोंवर लिहिलं आहे. 

"चढ़ता है सूरज ढलता है, यह झूठ न ज़्यादा चलता है, पल दो पल का उजाला है झूठ का, अरे काला है जी काला, मूह काला है झूठ का" असं देखील अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. या प्रकरणी चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीने चार वेळा समन्स बजावले होते. त्यांपैकी केवळ एकदाच ते चौकशीसाठी हजर राहिले. तीन वेळा ते गैरहजेर राहिल्यानंतर अखेर ईडीचे पथक थेट संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. 

संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी ईडीच्या पथकाने झाडाझडती घेतली आणि त्यांची साडे नऊ तास चौकशी केली. त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र तपासात सहाकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत ईडीचे अधिकारी संजय राऊतांना मुंबईतील ईडी कार्यालयात घेऊन गेले. त्यानंतर तेथेही त्यांची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली आणि अखेरीस त्यांना अटक केल्याचं समोर आलं आहे. 

 

Web Title: BJP Atul Bhatkhalkar slams Shivsena Sanjay Raut Over ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.