Atul Bhatkhalkar : "संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला नाही मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबागमध्ये जमिनी कुठून आल्या?"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 10:30 AM2022-07-31T10:30:32+5:302022-07-31T10:40:17+5:30
BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Sanjay Raut : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली. दरम्यान, यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे. याच दरम्यान आता भाजपाने संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबागमध्ये जमिनी कुठून आल्या?" असा खोचक सवाल विचारला आहे.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर (Shivsena Sanjay Raut) निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय. आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही.... ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत" असं म्हटलं आहे. तसेच "भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ बोंबाबोंब करा हो, पण भगवा झेंडा नाचवू नका तिथे. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. भगव्याचा इतका अपमान कुणी केला नसेल" असंही म्हटलं आहे.
करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय. आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही....
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत.
घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत. pic.twitter.com/6r8CHkUCJL
"कोविड काळात महाराष्ट्रात केलेला भ्रष्टाचार शिवसेना नेत्यांना पचणार नाही. तुरुंगात तर जावेच लागेल. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबागमध्ये जमिनी कुठून आल्या?" असा सवाल देखील अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. संजय राऊत यांनी एकामागून एक काही ट्वीट्स केली आहे. पहिल्या ट्वीटमध्ये राऊत यांनी शिवसेनेचं चिन्ह टाकत तरीही शिवसेना सोडणार नाही, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील असंही ते म्हणाले. यानंतर त्यांनी ईडीच्या कारवाईवरही एक ट्वीट केलं आहे. “खोटी कारवाई. खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र,” असं ते म्हणाले आहेत.
कोविड काळात महाराष्ट्रात केलेला भ्रष्टाचार शिवसेना नेत्यांना पचणार नाही. तुरुंगात तर जावेच लागेल.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबाग मध्ये जमिनी कुठून आल्या?
शिवसेनेसाठी लढत राहणार
दरम्यान, राऊत यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन,” असं संजय राऊत यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ईडीची धाड
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. सध्या शोधमोहिम आणि चौकशी सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. यापूर्वी ईडीनं संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. परंतु संसदेचं अधिवेशन सुरू असल्याचं सांगत ते ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले होते. त्यांनी ईडीकडे मुदतवाढही मागितली होती. परंतु आज अचानक ईडीचे अधिकारी राऊत यांच्या घरी दाखल झाले.