Atul Bhatkhalkar : "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं"; भाजपाची शिवसेनेवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 11:22 AM2022-07-05T11:22:13+5:302022-07-05T11:30:44+5:30
BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
मुंबई - मुंबईमध्ये सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. त्याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेलाही पावसाचा फटका बसला आहे. लोकल सेवा उद्याप सुरू आहे ही प्रवाशांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पाच-१० मिनिटे उशिराने सुरू आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन्स १० मिनिटाच्या विलंबाने धावत आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने सर्वच नागरिकांना आपल्या कामासाठी घरातून बाहेर निघताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभाग या पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले , मुंबईला तुंबवून दाखवलं" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं... आता शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेतून देखील तोंड काळे करण्याची तयारी ठेवावी..." असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले , मुंबईला तुंबवून दाखवलं...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 5, 2022
आता शिवसेनेने @mybmc तून देखील तोंड काळे करण्याची तयारी ठेवावी... https://t.co/SCiP9ecryh
अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "नवे शिवसेना भाजप सरकार जनतेच्या सेवेत रुजू झाले. टोमणे, फेसबुक लाईव्ह, तोंडाच्या वाफा हा सगळा महाराष्ट्राचा अडीच वर्षांचा दुर्दैवी भूतकाळ होता. आता हे आपले सरकार. गोरगरीब दुबळ्या जनतेचे सरकार" असं म्हटलं आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, अशा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वडाळा, अंधेरी सबवे, सायन गांधी मार्केट, दादर हिंदमाता यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गरज असल्यासच घराबाहेर पडा असा सल्लादेखील मुंबई आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.
मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाळा. पण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूरसह आसपासच्या परिसरात पावसाचा जोर चांगलाच दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. NDRF च्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे.