“उद्धव ठाकरेंनी अर्धीच गोष्ट सांगितली, माझे वडील अयोध्येला गेले होते पण...”; अतुल सावेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 01:53 PM2022-06-09T13:53:24+5:302022-06-09T13:54:36+5:30

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बाबरी मशिदीसंदर्भातील दाव्यावर अतुल सावे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

bjp atul save replied cm uddhav thackeray over moreshwar save babri masjid claim | “उद्धव ठाकरेंनी अर्धीच गोष्ट सांगितली, माझे वडील अयोध्येला गेले होते पण...”; अतुल सावेंचा पलटवार

“उद्धव ठाकरेंनी अर्धीच गोष्ट सांगितली, माझे वडील अयोध्येला गेले होते पण...”; अतुल सावेंचा पलटवार

googlenewsNext

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या औरंगाबाद येथील सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. बाबरी मशिदीचे पतन, काश्मिरी पंडित, भाजप प्रवक्त्यांनी प्रेषितासंदर्भात केलेले आक्षेपार्ह विधान, महागाई यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला. बाबरीच्या मुद्द्यावर बोलताना दिवंगत मोरेश्वर सावे यांच्यासह आमचे शिवसैनिक अयोध्येत गेले होते. त्यांच्या मुलाने खरे-खोटे सांगावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. याला मोरेश्वर सावे यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार अतुल सावे (Atul Save) यांनी प्रत्युत्तर दिले असून, उद्धव ठाकरे यांनी अर्धीच गोष्ट सांगितल्याचे म्हटले आहे. 

बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा अयोध्येत एकही शिवसैनिक नव्हता असा दावा करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी भाजप आमदारालाच पुढे करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे मोरेश्वर सावे १९९२ साली शिवसैनिकांसह अयोध्येला गेले होते. खरे वाटत नसेल तर आता भाजपमध्ये असलेले त्यांचे पुत्र अतुल सावे यांनाच देवेंद्र फडणवीस यांनी विचारावे. ते तुम्हाला खरे-खोटे सांगतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना अतुल सावे यांनी आपली भूमिका मांडली.

उद्धव ठाकरे यांनी पूर्ण गोष्ट का सांगितली नाही?

अतुल सावे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद येथील भाषणात माझे वडील स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला. माझे वडील मोरेश्वर सावे हे बाबरी मशीद पडली तेव्हा कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. पण अयोध्येला जाऊन आल्यानंतर माझे वडील सातत्याने प्रखर हिंदुत्त्वाची भूमिका मांडत होते. ही गोष्ट शिवसेना नेत्यांना आवडली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांकडून मोरेश्वर सावे यांचे खच्चीकरण करण्यात आले. शिवसेनेने माझ्या वडिलांना साधे लोकसभेचे तिकीट दिले नाही. उद्धव ठाकरे यांनी मोरेश्वर सावे अयोध्येला गेल्याचे सांगितले, पण पूर्ण गोष्ट का सांगितली नाही, हा माझा सवाल आहे. मोरेश्वर सावे यांचा इतकाच अभिमान होता, तर शिवसेनेने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट का दिले नाही, हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारु इच्छितो, असे अतुल सावे यांनी म्हटले. 

नेमके काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

देवेंद्र फडणवीस हे आता सांगत आहेत की, बाबरी पतनावेळी मी अयोध्येत गेलो होतो. तिकडे एकही शिवसैनिक नव्हता. पण औरंगाबादमधील आमचे मोरेश्वर सावे आणि इतर शिवसैनिक त्यावेळी अयोध्येत होते. मोरेश्वर सावे हे माजी महापौर आणि खासदार आहेत. आता मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव तुमच्याकडे (भाजप) येऊन आमदार झाले आहेत. ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आमदार झाले आहेत. तेव्हा सावे यांनीच देवेंद्र फडणवीस यांना सांगावे की, माझे बाबा अयोध्येला गेले होते की नव्हते. सावे ज्या फडणवीसांची पालखी वाहत आहेत त्यांच्यासमोर खरे-खोटे करावे. मोरेश्वर सावे त्यावेळी अयोध्येला गेले नसतील तर त्यांच्या चिरंजीवांनी सरळ सांगून टाकावे की, माझे बाबा अयोध्येला गेले नव्हते.
 

Web Title: bjp atul save replied cm uddhav thackeray over moreshwar save babri masjid claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.