Maharashtra Politics: “जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या १०० पिढ्या बरबाद होतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 10:23 PM2022-12-05T22:23:10+5:302022-12-05T22:24:21+5:30
Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यांनो सावधान राहा, असा इशाराही भाजप नेत्याने दिला आहे.
Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानांवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मात्र, यातच आता भाजपच्याच एका नेत्याने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या १०० पिढ्या बरबाद होतील, या शब्दांत घडामोडींवर नाराजी व्यक्त करत टीकास्त्र सोडले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार संजय गायकवाड, प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. तर, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकाराविरोधात विरोधक जोरदार हल्लाबोल करत आहेत. शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला त्यांनी घरचा आहेर दिला होता. आता भाजप नेते बबनराव लोणीकर यांनीही याबाबत खंत व्यक्त करत पक्षातील नेत्यांना आवाहन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगभर गौरव केला जातो
छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार आदर्शच होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ देशात नाही, तर जगभर गौरव केला जातो. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्यासारखा रयतेचा राजे होणे नाही, असे लोणीकर यांनी म्हटले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जगामध्ये आदराने घेतले जाते. त्यामुळे राजकीय पक्षाच्या लोकांना विनंती आहे की, शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलू नका, असे आवाहन लोणीकर यांनी केले आहे.
दरम्यान, तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलाल तर तुमच्या शंभर पिढ्या बरबाद होतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापराल तर विनाशकाले विपरीत बुद्धी तुम्हाला सुचत आहे. त्यामुळे तुमच्या पापाचा घडा भरला आहे, असे म्हणत लोणीकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. या देशात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यांनो सावधान राहा. महाराज आमचे आदर्श राजे आहेत, असे लोणीकर यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"