राज्यात भाजपा आता बॅकफूटवर
By admin | Published: November 9, 2015 03:25 AM2015-11-09T03:25:44+5:302015-11-09T03:25:44+5:30
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे परिणाम महाराष्ट्रातील भाजपालादेखील सहन करावे लागू शकतात. भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांची
यदु जोशी, मुंबई
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याचे परिणाम महाराष्ट्रातील भाजपालादेखील सहन करावे लागू शकतात. भाजपा आम्हाला विश्वासात घेत नसल्याची राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांची तक्रार आता त्यांना गांभीर्याने घ्यावी लागेल, असे दिसते. मुंबई महापालिकेच्या सव्वा वर्षावर आलेल्या निवडणुकीत बिहारमधील नव्या सत्तासमीकरणांचा फटका भाजपाला बसून, काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी गेल्या वर्षभरात दोघांनी विरोधक असल्याप्रमाणे एकमेकांवर टीका केली आहे. भाजपा आम्हाला सरकारमध्ये गृहीत धरते, अशी तक्रार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी वर्षपूर्तीच्या निमित्ताने केली होती. बिहारच्या निवडणुकीत भाजपाला निर्विवाद यश मिळाले असते तर मित्रपक्षांची फारशी चिंता न करता महाराष्ट्रातील कारभार हाकण्याकडे पक्षाचा कल राहिला असता. राजकीय जाणकारांच्या मते, आता भाजपाला तशी मनमानी करता येणार नाही.
मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ च्या सुरुवातीला होणार आहे. बिहारी आणि हिंदी भाषकांची मोठी मतसंख्या मुंबईत आहे. बिहारमध्ये जदयू-राजद-काँग्रेस आघाडी जिंकली आहे आणि त्यातील केवळ काँग्रेसच मुंबई महापालिकेची निवडणूक लढते, हे लक्षात घेता बिहारमधील निकालांचा फायदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला होऊ शकतो. मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम मूळ बिहारीच आहेत. मुंबईत मराठी भाषकांची मते मुख्यत्वे शिवसेनेला आणि गेल्या दोन निवडणुकांपासून मनसेकडेही जातात. हिंदी मतदारांचा कल मुख्यत्वे काँग्रेसकडे राहत आला आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपाची खुमखुमी लपून राहिलेली नाही. युती न करता लढलो तर बिहारींसह हिंदी भाषकांची मते मोठ्या प्रमाणात मिळतील, असा भाजपाचा होरा असावा. मात्र आजच्या निकालाने त्याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळेच भाजपाला आत्मचिंतन करावे लागू शकते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पक्ष या भाजपाच्या छोट्या मित्रपक्षांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात संधी देण्याची सुरुवातीपासूनच मागणी केली आहे. विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्या होत नसल्याबद्दल त्यांनी वेळोवेळी नाराजीदेखील व्यक्त केली आहे.
बिहारमधील निकालाच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांकडून या दोन्हींबाबत भाजपावर दबाव वाढू शकतो. वेगवेगळ्या शासकीय समित्यांवर नियुक्त्यांबाबत ६०/४० चा फॉर्म्युला भाजपा-शिवसेनेच्या समन्वय समितीच्या बैठकीत ठरला होता; पण भाजपाचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये त्याला केराची टोपली दाखवून मनमानी केली जात असल्याची तक्रार याच आठवड्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर केली होती.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे वेध भाजपाला लागले आहेत; मात्र आजच्या निकालाने ही व्होट बँक भाजपासोबत जाईल की नाही, याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील नेते प्रचारापासून दूर
बिहारमधील प्रचारामध्ये महाराष्ट्रातील एकाही भाजपा नेत्याला पाठविण्यात आले नव्हते. भाजपा शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्तेत आहे. बिहारींमध्ये सेनेबद्दल राग असल्याने इकडचे नेते तिकडे गेले तर विपरीत परिणाम होईल, म्हणून महाराष्ट्रीय नेत्यांना पाठविले नव्हते.