भाजपाने बाळासाहेबांच्या आशिर्वादाचा विश्वासघात केला - उद्धव ठाकरे
By admin | Published: October 2, 2014 01:12 PM2014-10-02T13:12:17+5:302014-10-02T14:09:58+5:30
गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपाने बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली
Next
>ऑनलाइन लोकमत
फलटण, दि. २ - गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेली युती तोडत भाजपाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाचा विश्वासघात केल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपाला १३४ जागा द्यायला शिवसेना नामर्द आहे का असा सवाल विचारत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. फलटणमधील प्रचारसभेत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीसमोर सोन्याचं ताट वाढून ठेवलं होतं, शिवछत्रपतींचाही आम्हाला आशिर्वाद होता मात्र भाजपाने युती तोडत ही सोन्यासारखी संधी गमावली असेही ते म्हणाले. संकटकाळात शिवसेना नेहमी भाजपाच्या पाठीशी होती, मात्र चांगले दिवस आल्याचे दिसताचा भाजपाने लगेच नातं तोडलं. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्यासाठी भाजपाने युती तोडल्याचा आरोप उद्धव यांनी केला. शिवसेना संपवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ राज्यात प्रचारासाठी येणार आहे, असेही ते म्हणाले.
अजित पवारांनी शेतक-यांची क्रूर थट्टा केल्याचे सांगत त्यांनी आघाडी सरकारवरही हल्लाबोल केला. सही करता येते हे दाखवण्यासाठीच पृथ्वीराज चव्हाण जाहिरातबाजी करत असल्याचा टोमणाही त्यांनी मारला. आघाडी सरकारमुळे शेतक-यांच्या डोळ्यांत अश्रू असून तेच अश्रू आपण पुसणार असल्याचे ते म्हणाले.