Maharashtra Politics: BJPचा मेगा प्लान! मिशन २०२४साठी ३ लाख कार्यकर्त्यांना स्पेशल ट्रेनिंग; करेक्ट कार्यक्रम करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 11:47 AM2022-10-22T11:47:07+5:302022-10-22T11:47:52+5:30
Maharashtra News: महाराष्ट्रातील १२ हजार कार्यकर्त्यांचा समावेश असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra Politics: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असली, तरी यामध्ये भाजप सर्वांत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात थोडक्यासाठी पराभव पत्करावा लागला होता, त्या मतदारसंघावर भाजप अधिक भर देताना दिसत आहे. भाजपने खास रणनीति तयार केली असून, आता कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी विशेष प्लान तयार केला असून, याअतंर्गत तब्बल ३ लाख मुस्लिम कार्यकर्त्यांना भाजप विशेष प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणातून भाजप आपल्या कार्यकर्त्यांना तयार करणार आहे. अपप्रचार करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना या विशेष प्रशिक्षणातून धडे दिले जाणार आहेत. भाजप राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील १२ हजार कार्यकर्त्यांचा समावेश असणार
देशभरातील भाजप प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या निवडक मुस्लिम कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहे. यात महाराष्ट्रातील १२ हजार अल्पसंख्य कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती जमाल सिद्धीकी यांनी दिली. भाजप मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप कार्यकर्ते उत्तर देतील. कार्यकर्त्यांना अपप्रचार देणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी तयार करण्याचे प्रमुख उद्दीष्ट या प्रशिक्षणातून साध्य करण्याचा प्रयत्न असेल, असेही सिद्धीकी म्हणाले. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यात आल्यात नुकतीच जमाल सिद्धीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी पोलीस स्थानकात तक्रारही दिली आहे. त्यानंतर आता जमाल सिद्धीकी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली असल्याचे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"