...तर भाजपा शिवसेनेला डोईजड
By admin | Published: March 1, 2017 01:55 AM2017-03-01T01:55:42+5:302017-03-01T01:55:42+5:30
स्पष्ट बहुमत नसले तरी भाजपापेक्षा दोन पावले पुढे असलेल्या शिवसेनेला महापौरांच्या रूपाने सभागृह व प्रशासनावर वचक ठेवता येणार आहे.
मुंबई : स्पष्ट बहुमत नसले तरी भाजपापेक्षा दोन पावले पुढे असलेल्या शिवसेनेला महापौरांच्या रूपाने सभागृह व प्रशासनावर वचक ठेवता येणार आहे. मात्र तिप्पट सदस्य संख्या वाढलेल्या भाजपाची डोकेदुखी त्यानंतरही कायम राहणार आहे. युती न झाल्यास महत्त्वाच्या समित्यांमध्ये उभय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र असण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपदावर दोन्ही पक्ष दावा करत असल्याने युतीबाबत अनिश्चितता आहे. अपक्षांची मोट बांधून शिवसेनेने ८८ सदस्य संख्येने महापौरपदाकडे कूच केली आहे. विरोधकांची साथ मिळाल्यास शिवसेनेचा महापौर निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचे ९ तर भाजपाचे ५१ नगरसेवक वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या स्थायी समितीमध्येही भाजपाची ताकद वाढणार आहे.
सध्या शिवसेना नऊ व भाजपा चार सदस्य असलेल्या स्थायीमध्ये शिवसेनेची सदस्य संख्या एकाने तर भाजपाची पाचने वाढणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाची युती न झाल्यास स्थायी समितीमध्ये महत्त्वाच्या प्रस्तावावरून दोन्ही पक्षांमध्ये वादावादी होताना दिसेल. हीच स्थिती सुधार या महत्त्वाच्या समितीमध्येही दिसून येईल. (प्रतिनिधी)
>बेस्ट कोण? : बेस्ट या आणखी एका महत्त्वाच्या समितीमध्ये भाजपा आठ तर शिवसेनेचे सहा सदस्य असणार आहेत. यामुळे बेस्टमध्येही दोन्ही पक्षांमध्ये वाद रंगलेला दिसेल.
स्वीकृतमध्येही भाजपाचे वजन वाढले
निवडून आलेल्या एकूण सदस्य संख्येनुसार पाच स्वीकृत सदस्यांसाठी राखीव जागेचे वाटप होत असते. आतापर्यंत शिवसेना दोन, भाजपा एक आणि काँग्रेसला दोन जागा मिळत होत्या. मात्र काँग्रेसची ताकद कमी आणि भाजपाचे सदस्य वाढल्यामुळे तेथेही त्यांची सरशी होणार आहे. भाजपाला दोन तर काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक नेमता येणार आहे.