‘मटका’ आरोपाचा भाजपला ‘फटका’
By admin | Published: November 5, 2015 12:22 AM2015-11-05T00:22:35+5:302015-11-05T00:25:27+5:30
प्रचारातील टीका भोवली : तीनही उमेदवार पराभूत
विश्वास पाटील- कोल्हापूर --भाजपकडून मटकेवाल्यांना, गुन्हेगारीशी संबंधित व दारूगुत्तेवाल्यांना उमेदवारी दिल्याची जोरदार टीका प्रचारात शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी तर भाजपला उपरोधाने ‘मटका’ हे चिन्ह शोभून दिसले असते, असा आरोप केला होता. या टीकेचा फटका भाजपला बसला असल्याचे निकालावरून दिसते.शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीर सभेतच भाजपच्या तीन उमेदवारांवर गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये राजलक्ष्मीनगर प्रभागातील उमेदवाराचे पती दत्ता बामणे, नगरसेवक आर. डी. पाटील आणि दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातील हेमंत कांदेकर यांचा समावेश होता. या तिन्ही ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर असला तरी विजयापासून लांब राहिल्याचे निकालावरून दिसते आहे. राजलक्ष्मीनगर प्रभागात पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या वर्षा चावरे यांना डावलून तिथे काँग्रेसमधून आलेल्या शोभा बामणे यांना उमेदवारी दिली. गतनिवडणुकीत खुद्द चंद्रकांतदादा यांनीच दत्ता बामणे यांच्यावर टीका केली होती व त्यांनाच भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिल्याबद्दल पक्षावर टीकेची झोड उठली. प्रभागात भाजपचे हक्काचे मतदान असताना तिथे पक्ष पराभूत होण्यामागे ही टीकाच कारणीभूत ठरली.पक्षाचे महापालिकेतील सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक असलेले आर. डी. पाटील यांचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यांची कन्या महालक्ष्मी मंदिर प्रभागातून निवडणुकीस उभ्या होत्या. उच्चशिक्षित व तरुण उमेदवार असतानाही त्यांचा मोठा पराभव झाला. या पराभवात आर. डी. यांच्यावरील आरोपांपेक्षा त्यांनी शिवसेनेशी घेतलेला पंगा जास्त कारणीभूत ठरल्याचे दिसते आहे.
दुधाळी पॅव्हेलियन प्रभागात पक्षाने हेमंत कांदेकर यांना उमेदवारी दिली होती. कांदेकर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याची टीका प्रचारात झाली होती. त्यांनी चांगली मते घेतली तरी जागा जिंकता आली नाही.
भाजप हा साधनशूचिता मानणारा पक्ष आहे. गुंडा-पुंडांना उमेदवारी देणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जाहीरपणे सांगत होते व प्रत्यक्षात उमेदवाराचे फक्त ‘इलेक्टिव्ह मेरिट’च पक्षाने पाहिले.
रायगड कॉलनी-बाबा जरगनगर प्रभागात भाजपने माजी जिल्हाध्यक्ष नाना जरग यांच्या स्नुषा वैभवी जरग यांना उमेदवारी नाकारली. श्रीमती जरग या प्रभागात स्पर्धेत नसल्याचा सर्व्हे असल्याचे पालकमंत्री सांगत होते परंतु ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून जरग यांनी जोरदार लढत दिली. तिथे भाजपच्या गीता गुरव अवघ्या २६ मतांनी विजयी झाल्या. पक्षाने त्यांच्या निष्ठेचा विचार केला नाही. त्याचा परिणाम म्हणून या दोन्ही प्रभागांत भाजपचा पराभव झाला. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यास तिथे संधी दिली असती तर विजय मिळाला असता असे चित्र दिसते.
बंड केले; पक्ष पराभूत..
शिवसेनेचे हाडाचे कार्यकर्ते असलेले व रिक्षाचालक सेनेचे प्रमुख राजेंद्र जाधव हे तटाकडील तालीम प्रभागातून इच्छुक होते, परंतु पक्षाने त्यांना डावलून माजी महापौर उदय साळोखे यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. जाधव यांना व्यक्तिगत करिश्मावर आणि सहानुभूतीमुळे तब्बल ९०२ मते मिळाली आणि साळोखे यांना पक्षाचे पाठबळ असतानाही ९०५. साळोखे यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत साळोखे यांनी अपक्ष लढून २६८ मते घेतली. तसा हा प्रभाग शिवसेनेचा हुकमी परंतु बंडखोरीमुळे पक्षाची हक्काची जागा कमी झाली. पांजरपोळ प्रभागातूनही कमलाकर जगदाळे यांच्या पत्नीस अपक्ष लढून २५२ मते मिळाली. या प्रभागात भाजपच्या भाग्यश्री शेटके विजयी झाल्या.