शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार

By admin | Published: June 29, 2016 07:28 PM2016-06-29T19:28:27+5:302016-06-29T19:47:33+5:30

भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र शिवसैनिकांनी फाडल्यामुळे भाजपा नगरसेवकांनी ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमावर आज बहिष्कार टाकला़

BJP boycott on Shiv Sena's program | शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार

शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपाचा बहिष्कार

Next

ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. २९ : भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र शिवसैनिकांनी फाडल्यामुळे भाजपा नगरसेवकांनी ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमावर आज बहिष्कार टाकला़ मित्रपक्षाच्या या पावित्र्यामुळे शिवसेनेनेही मवाळ भूमिका घेत भाजपाविरोधात थेट भाष्य करणे टाळले़
भाजपाने वर्षभर विरोधी पक्षाची भूमिका वठवत आपल्याच मित्रपक्षाला अनेकवेळा अडचणीत आणले़ नालेसफाई, रस्ते घोटाळे उघड केल्याचे श्रेय घेत भाजपाने शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले़ यामुळे शिवसेना भाजपा युतीमधील वाद चिघळत गेला़ महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर उभय पक्षांनी एकमेकांच्या कार्यक्रमात राडा करण्यास सुरुवात केली आहे़
सोमवारी भगवती रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसैनिक व भाजपाचे कार्यकर्ते भिडले़ तर मंगळवारी शिवसैनिकांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा व मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशीष शेलार यांचे पोस्टर्स फाडले़ यामुळे संतापलेले अ‍ॅड़ शेलार आणि भाजपाचे नगरसेवक रेतीबंदर येथील ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात गैरहजर राहिले़ राजशिष्टाचार म्हणून केवळ उपमहापौर अलका केरकर या कार्यक्रमात उपस्थित होत्या़
शिवसेनेचा भाजपाला अप्रत्यक्ष टोला
पंपिंग स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांसह भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला़ मुंबईत विकासाच्या नावाखाली चटईक्षेत्र निर्देशांक वाढविण्यासाठी दबाव टाकला जात आहे़ मात्र पायाभूत सुविधांचे नियोजन व त्याच्या उभारणीचा खर्च उचलण्यासाठी कोणी पुढे येत नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला़ स्मार्ट सिटी प्रकल्पातून केंद्राने मुंबईला वगळण्याने ठाकरे यांनी हा निशाणा साधला़

थोडी सबुरी ठेवा़
नालेसफाईचे काम असमाधाानकारक असल्याने मुंबईत पाणी तुंबणार, अशी शक्यता भाजपाने वर्तविली होती़ मात्र काही लोकांना धीर धरता येत नाही़ त्याआधीच त्यांची टिकाटिपणी सुरु होते़ मोठा पाऊस पडूनही कुठे पाणी तुंबले नाही, असा दावा करीत ठाकरे यांनी भाजपाला अप्रत्यक्ष सुनावले़ मात्र पंपिंग स्टेशनचे थोडे श्रेय भाजपालाही शिवसेनेने आवर्जून देत समतोल ठेवला़

बहिष्कार नव्हे निषेध
भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचा आपमान शिवसैनिकांनी केल्यामुळे त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर बसणे आता शक्य नाही़ अशी भूमिका घेत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ शेलार उद्घाटन कार्यक्रमात गैरहजर राहिले़ मात्र हा बहिष्कार नसून निषेध असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे़

 

Web Title: BJP boycott on Shiv Sena's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.