भाजपाने हिंदुत्वाशी नाते तोडले !
By admin | Published: October 6, 2014 04:49 AM2014-10-06T04:49:45+5:302014-10-06T04:49:45+5:30
हिंदुत्वाच्या विचारावर झालेली व २५ वर्षांपासूनची युती तोडून भाजपाने हिंदुत्वाशी असलेले नातेही तोडले. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते यालाच
नागपूर : हिंदुत्वाच्या विचारावर झालेली व २५ वर्षांपासूनची युती तोडून भाजपाने हिंदुत्वाशी असलेले नातेही तोडले. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते यालाच, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्मभूमीत केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड असलेल्या रेशीमबागेतील स्मृती मंदिराजवळील मैदानावर रविवारी शिवसेनेची प्रचारसभा झाली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवानो’असे उपस्थितांना आवाहन करीत थेट हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातला. याच मैदानावर शुक्रवारी संघाचा दसरा महोत्सवाचा कार्यक्रम झाला. व्यासपीठाची जागाही तीच आहे. व्यासपीठ हिंदू विचाराचे आहे. पंचवीस वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्याच विचारावर युती झाली होती. मात्र भाजपाने युती तोडून हिंदुत्वाशी नाते तोडले. त्यांनी असे का केले याचा जाब त्यांना महाराष्ट्राला द्यावा लागेल, असे ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत आम्ही सोबत होतो. दिल्ली आम्ही जिंकली, विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनता युतीकडे सत्ता सोपवण्यासाठी उत्सुक होती. पण भाजपाला ते नको होते. भाजपासाठी आम्ही छातीवर वार झेलले. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा खुद्द शिवसेनाप्रमुखांनी ‘हो आम्ही मशीद पाडली’ असे जाहीरपणे सांगितले होते. अमरनाथ यात्रेच्या वेळीही आम्हीच हिंदूंसाठी आवाज उठविला. एवढेच नव्हे तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेव्हा हिंदूराष्ट्राची संकल्पना मांडली तेव्हा त्याला समर्थन देणारी शिवसेनाच होती. शरद पवार यांनी जेव्हा संघावर टीका केली त्यालाही उत्तर शिवसेनेनेच दिले होते. भाजपासाठी आम्ही अनेक वेळा त्याग केला. इतर राज्यात आम्ही उमेदवार उभे केले नाही. पण भाजपाने पाठित खंजीर खुपसला, अशी टीका उद्धव यांनी केली. दिल्लीत तुम्ही (भाजपा) असताना महाराष्ट्रात आम्हाला त्रास का देता, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)