...म्हणून भाजपानं युती तोडली, एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरून संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 12:43 PM2023-08-13T12:43:21+5:302023-08-13T12:44:01+5:30
परंतु निकाल लागल्यानंतर भाजपाने शब्द फिरवला असा आरोप संजय राऊतांनी केला.
मुंबई – एकनाथ शिंदे यांनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करणार होते. परंतु भाजपाने मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण हे विचारले तेव्हा आम्ही एकनाथ शिंदे असं नाव सांगितले. त्यानंतर ही युती तोडली असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्रिपदावरून राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले की, आता भाजपा भंपक बोलतायेत. महाराष्ट्राच्या जनतेला खोटं सांगून दिशाभूल करू नका. शिवसेना फोडून त्याच एकनाथ शिंदेंना तुम्ही मुख्यमंत्री करता. त्यामुळे तुम्ही कटकारस्थान करून हे सगळे केले. शिवसेनेबद्दल कपट भावना भाजपाच्या मनात होती. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, एनडीएच्या बैठकीत त्यांनी युतीबाबत केलेले विधान असत्य आहे. २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली ती एका जागेवरून..ही युती तोडण्याची जबाबदारी पक्षाने एकनाथ खडसेंवर सोपवली. खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या सूचनेवरून भाजपाने शिवसेनेसोबत युती तोडली. मोदी लाट होती त्यामुळे स्वबळावर भाजपाची सत्ता हवी होती म्हणून २५ वर्षाची युती तोडली. २०१९ मध्येही भाजपाने शिवसेनेसोबत युती तोडली. जागावाटप, सत्तावाटप एकमत झाले. पॉवर शेअरिंग ५०-५० टक्के होते. परंतु निकाल लागल्यानंतर भाजपाने शब्द फिरवला असा आरोप संजय राऊतांनी केला.
दरम्यान, केंद्रीय गृहविभागाकडून यंदा राज्याच्या पोलीस दलासाठी एकही पदक दिले नाही यावर बोलताना या राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री, सक्षम गृहमंत्री आणि २ कर्तबगार उपमुख्यमंत्री लाभलेत त्यांनी बोलायला हवं. प्रत्येकवेळी महाराष्ट्राचा अपमान दिल्लीकडून होतोय त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवे. उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार करायला मुख्यमंत्री झालोय की आराम करायला झालोय हे स्पष्ट करावे. मुख्यमंत्री आरामाला गेलेत असं वाचले. महाराष्ट्राच्या अस्मितेवर स्वाभिमानावरील विषयावर बोलायला हवे. आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला परवडणार नाही. महाराष्ट्राला डावललं जाते. प्रत्येकवेळी महाराष्ट्राचा अपमान होतोय हे धोरण सरकारने स्वीकारले आहे. तुमच्या मानेत गुलामगिरी पट्टा बांधलाय त्यावर बोला असं आव्हानही राऊतांनी भाजपाला दिले.