भाजपा सेनेने राखले बालेकिल्ले
By admin | Published: February 24, 2017 08:17 AM2017-02-24T08:17:20+5:302017-02-24T08:17:38+5:30
उत्तर पूर्व मुंबईत शिवसेना भाजपाने गड राखल्याने
मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत शिवसेना भाजपाने गड राखल्याने, दोघांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली. एकूण ३९ प्रभागांपैकी शिवसेनेच्या १३ तर भाजपाच्या १२ उमेदवारांनी बाजी मारली. मनसे, काँग्रेस राष्ट्रवादीचाही प्रभाव कमी झाला़ मानखुर्द शिवाजीनगरमध्ये समाजवादी पक्षाने पाच जागांवर आपला ठसा उमटवला.
उत्तर पूर्व मुंबईत खासदार किरीट सोमय्या यांनी मुलुंडमध्ये पुत्र नील, तसेच शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपात प्रवेश केलेल्या प्रभाकर शिंदेला उमेदवारी दिल्याने, भाजपा आमदार सरदार तारासिंग यांची नाराजी ओढावून घेतली होती. त्यामुळे मुलुंडमध्ये भाजपाच्या पाच उमेदवारांच्या विरुद्ध भाजपाचे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. मुलुंड भाजपा आमदार सरदार तारासिंग यांनी सलग २० वर्षे मुलुंडमध्ये भाजपाचा गड राखवून ठेवला होता. त्यांच्याच उमेदवारांना संधी दिली नाही. दोघांमधील वाद वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याने तारासिंगही प्रचारात उतरले. त्याचाही फायदा भाजपा उमेदवारांना झाला. भाजपाने घवघवीत मतांनी राष्ट्रवादीचे नंदकुमार वैती मनसेच्या सुजाता पाठक यांचा पत्ता साप करत, सहाच्या सहा जागांवर शिक्कामोर्तब केले.
भांडुपमधील शिवसेनेच्या उमेदवारांनी सेनेचा बालेकिल्ला राखून ठेवला. सेनेच्या गडात सर्वांचे ‘भाई’ म्हणून ओळख असलेले रमेश कोरगावकर यांनी मनसेच्या नगरसेविका अनिषा माजगावकर यांना धोबीपिछाड देत चौथ्यांदा विजय मिळविला. प्रभाग क्रमांक ११५ मध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्याने राजकीय वातावरण तापले होते. याचाच फायदा शिवसेनेचे उपेंद्र सावंत यांना झाला. भाजपाचे जितेंद्र घाडीगावकर यांचा तब्बल तीन हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला.
भांडुप पूर्वेकडे पालिका गटनेता धनंजय पिसाळ यांना धक्का बसला आहे. भाजपा नगरसेवक मंगेश पवार यांच्या पत्नी सारिका मंगेश पवार यांनी त्यांच्या पत्नीला धोबीपछाड देत विजय मिळविला आहे. एस वॉर्डमध्ये भांडुप राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय पाटील यांना राष्ट्रवादीच्या मनीषा रहाटे यांच्या एकाच सीटवर समाधान मानण्याची नामुष्की ओढावली.
शिवसेना आमदार अशोक पाटील यांनी नगरसेवक पद आपल्याच पारड्यात ठेवण्याचे स्वप्न तूर्तास तरी काँग्रेस उमेदवार संजय पाटील यांची वहिनी प्रमिला पाटील यांच्या विजयामुळे धुळीत मिळाले आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत त्यांच्या पत्नीचा पराजय झाला. विक्रोळीत कमी उंचीच्या मनसेच्या जयंत दांडेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत, भाजपामध्ये आलेल्या आमदार मंगेश सांगळेना झोपविले. मात्र, अवघ्या २४० मतांनी दांडेकर यांना हार पत्करावी आहे.
घाटकोपरमध्ये गुजराती व जैन लोकवस्ती अधिक आहेत. येथे भाजपा आमदार प्रकाश मेहता यांचे वर्चस्व अधिक आहे. तरीदेखील या भागात त्यांना भाजपाच्या दोन उमेदवारांवरच समाधान मानावे लागले. भाजपाच्या सर्वात श्रीमंत कोट्यधीश उमेदवारांपुढे काँग्रेस आमदार प्रवीण छेडा यांना हार पत्कारावी लागली. (प्रतिनिधी)
शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने घाटकोपरमधून बंडखोरी करत, अपक्ष उभ्या राहिलेल्या सुधीर मोरेच्या वहिनीने विजय मिळवल्याने सेनेला धक्का बसला. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये समाजवादी पक्षाने पाच जागांवर ठसा उमटविला आहे.
एकूणच उत्तर पूर्व मुंबईत शिवसेना १३, भाजपा १२, राष्ट्रवादी ३, काँग्रेस ३, समाजवादी ५, मनसे २ आणि एक अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे.