भाजपाचा विजयरथ काँग्रेस रोखू शकेल का?

By admin | Published: February 18, 2017 02:04 AM2017-02-18T02:04:58+5:302017-02-18T02:04:58+5:30

महापालिकेतील भाजपच्या सत्तेला दोन टर्म म्हणजे दशक पूर्ण झाले आहेत. ‘हॅट्रीक’ मारण्यासाठी भाजप सज्ज झाली असून दुसरीकडे दहा

BJP can prevent Vijayaratha Congress? | भाजपाचा विजयरथ काँग्रेस रोखू शकेल का?

भाजपाचा विजयरथ काँग्रेस रोखू शकेल का?

Next

कमलेश वानखेडे / नागपूर
महापालिकेतील भाजपच्या सत्तेला दोन टर्म म्हणजे दशक पूर्ण झाले आहेत. ‘हॅट्रीक’ मारण्यासाठी भाजप सज्ज झाली असून दुसरीकडे दहा वर्षांच्या वनवासानंतरही काँग्रेस नेत्यांनी धडा घेतलेला नाही. भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्याऐवजी गटातटाच्या वादात एकमेकांचे उमेदवार ‘रन राऊट’ करण्यातच धन्यता मानत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरकरांपुुढे विकासाचा पाढा वाचत असताना, दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्यावरील शाईफेक प्रकारामुळे गटबाजी प्रकर्षाने चव्हाट्यावर आली आहे. स्वबळावर लढत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.
गेल्या निवडणुकीत भाजप-सेना एकत्र लढली. या वेळी भाजपने स्वबळाचा नारा देत ‘मिशन १२५’ गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर शिवसेनेने भाजपमधील काही असंतुष्टांच्या हाती धनुष्यबाण सोपवून कमळावर निशाना साधला आहे. गेल्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी असतानाही काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. या वेळी आघाडी तुटताच राष्ट्रवादीने भाजपा व काँग्रेसच्या असंतुष्टांना हाताशी धरून घड्याला चाबी भरली. रिपब्लिकन फ्रंट, मुस्लीम लिग आदी पक्षांना सोबत घेत महायुती केली. काँग्रेसने लोकमंच व डॉ. राजेंद्र गवई यांच्याशिवाय कुणाशीही हात मिळविलेला नाही. राष्ट्रवादीचे टार्गेट काँग्रेस तर शिवसेनेचे लक्ष्य भाजप आहे. राष्ट्रवादी बऱ्यापैकी प्रभाव टाकत असून शिवसेनेला मात्र मातोश्रीवरून पाहिजे तशी रसद पुरविली जात नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत तोफ गर्जना करीत असताना खा. संजय राऊत यांना एक दिवसाच्या नागपूर मुक्कामी पाठवून शिवसेना निश्चिंत झाली. खरे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात येऊन शिवसैनिकाचा ‘आवाज’ बुलंद करणे आवश्यक होते.
तिकीट वाटपात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विद्यमान नगरसेवकांना धक्का दिला. भाजपने तब्बल २४ तर काँग्रेसने १० नगरसेवकांचे तिकीट कापले. पाठोपाठ बसपाने चार नगरसेवकांना हत्तीवरून उतरविले. तिकीट कटल्यामुळे सर्वच पक्षात मोठी बंडाळी झाली. शिस्तप्रिय संघ परिवाराशी संबंधित असलेल्या उमेदवारांनी काही जागांवर भाजपा विरोधात दंड थोपटल्याचे चित्र आहे. भाजप नेते डॅमेज कंट्रोलसाठी कसोसीने प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस नेत्यांनी आधी एकमेकांच्या समर्थकांचे तिकीट कापण्यासाठी व आता उमेदवार आपटण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांचे फोटो तर काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवारांच्या बॅनर, होर्डिंग्जवर झळकत आहेत.

Web Title: BJP can prevent Vijayaratha Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.