मुरकुटेंच्या उमेदवारीचा चेंडू भाजप की विखेंच्या कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 01:42 PM2019-07-07T13:42:02+5:302019-07-07T13:52:54+5:30
नेवासे मतदार संघातील उमेदवारी देण्याआधी राधाकृष्ण विखे यांच्या मर्जीचा सुद्धा पक्ष विचार करणार.
मुंबई - नेवासे मतदार संघातील भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना उमदेवारी देण्याविषयी पक्षातून विरोध होत आहे. तर राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गडाख यांच्यातील वाढती जवळीकता मुरकुटेंची अडचण वाढवू शकते अशी चर्चा पहायला मिळत आहे. तर विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबध लक्षात घेता, विखेंचा निर्णय अंतिम राहील असे बोलले जात आहे. त्यामुळे मुरकुटेंच्या उमेदवारीचा चेंडू भाजप की विखेंच्या कोर्टात, अशी चर्चा सुरु आहे.
मुरकुटे यांना पुन्हा विधानसभेत उमेदवारी दिली जाऊ नयेत यासाठी भाजपचे एक शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन, राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले. दुसरीकडे मुरकुटे यांनी उमेदवारी आपल्यालाच आहे, असा दावा केलेला आहे. त्यातच विखे-गडाख घराण्यामध्ये नुकतीच झालेली सोयरिक विचारात घेता दोघांनीही आता एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर शंकरराव गडाख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुरकुटे यांना पर्याय म्हणून शंकरराव गडाख यांचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो?.
नेवासे मतदार संघातील उमेदवारी देण्याआधी राधाकृष्ण विखे यांच्या मर्जीचा सुद्धा पक्ष विचार करणार. मात्र, भाजपमधून मुरकुटे यांना होत असलेला विरोध आणि विखे व गडाख यांची जवळीक लक्षात घेता, नेवासे मतदार संघातील राजकरणात नवीन भूंकप होण्याची चर्चा पहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुरकुटे यांना उमेदवारी बाबतचा निर्णय विखेंचा की भाजपचा असेल अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकरणात सुरु आहे.