उमेदवारीवरून भाजपात खदखद
By admin | Published: January 21, 2015 01:41 AM2015-01-21T01:41:55+5:302015-01-21T01:41:55+5:30
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला आलेली एकमेव जागा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना दिल्याने या जागेकरिता इच्छुक असलेले अनेकजण नाराज झाले आहेत.
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला आलेली एकमेव जागा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाघ यांना दिल्याने या जागेकरिता इच्छुक असलेले अनेकजण नाराज झाले आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या आग्रहामुळे वाघ यांची वर्णी लागल्याने इतरांची नावे मागे पडली.
विधान परिषदेच्या चार जागांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. शिवसेनेचे सुभाष देसाई, शिवसंग्रामचे विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना तीन जागा सोडल्यावर भाजपाकडे आपल्याकडील किमान दोन डझन इच्छुकांना देण्याकरिता केवळ एक जागा उरली होती. त्यावर जळगावमधील स्मिता वाघ यांची निवड केली गेली. त्या भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत. खडसे यांनी वाघ यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे या उमेदवारीकरिता प्रयत्नशील माधव भांडारी, शायना एन.सी., गणेश हाके, विनय नातू आदी मंडळी नाराज झाले आहेत. निवडणूक काळात भांडारी व शायना यांनी प्रवक्ते या नात्याने प्रसार माध्यमांत भाजपाची बाजू सातत्याने मांडली होती. त्यामुळे या दोघांपैकी एकाला विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या मागणीकरिता केलेल्या हिंसक अांदोलनामुळे त्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आहे. सदाभाऊ खोत हे त्यामुळे नाराज झाले आहेत. या सरकारसोबत राहायचे किंवा कसे याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)