“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 11:01 PM2024-05-01T23:01:09+5:302024-05-01T23:01:21+5:30
Udayanraje Bhosale News: मीच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा, असे संकेत शरद पवारांनी आपल्या भाषणात दिले आहेत, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
Udayanraje Bhosale News: लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उदयनराजे यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात कलगीतुरा रंगताना दिसत आहे. उदयनराजे यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलवरून शरद पवारांनी टोलेबाजी केली होती. या टोलेबाजीला उदयनराजे यांनी उत्तर दिले आहे. तसेच शरद पवारच माझे मुख्य प्रचारक असल्याचे म्हटले आहे.
ते कॉलर उडवताना सकाळ आहे की सायंकाळी आहे हे बघावे लागते, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला होता. यावर बोलताना, मी नेहमीच कॉलर उडवतो. मी लोकांच्या हिताच्या विरोधात काहीही केले नाही. मी सकाळी दुपारी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर आणि रात्री झोपेतसुद्धा कॉलर उडवतो. शरद पवारांनी हे संकेत दिले आहेत की, त्यांनी दिलेला उमेदवार हा चुकीचा आहे. उदयनराजे हेच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा, असे संकेत त्यांनी आपल्या भाषणात दिले आहेत. माझ्या निवडणुकीचे मुख्य प्रचारक म्हणून एवढ्या सभा सातारा लोकसभा मतदारसंघात ते घेत आहेत. जेणेकरून जास्तीतजास्त मतांनी मी निवडून आलो पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.
यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही
यशवंतराव चव्हाण यांचे विचार म्हणजे यशवंत विचार हे लोकांच्या कल्याणचे होते. भ्रष्टाचाराच्या बाजूचे नव्हते. जे कोणी भ्रष्टाचाराचे समर्थन करत असतील, त्यांचे विचार यशवंत चव्हाण यांचे असू शकत नाही. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे त्यांचे मानसपुत्र म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांना का सुचले नाही, अशी विचारणा उदयनराजे यांनी केली.
दरम्यान, लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात मागणी करत आहेत. ज्यांनी माथाडींच्या जिवावर आजपर्यंत आणि राजकारण केले, त्यांना त्यांचा विसर पडला आहे. माथाडी तरुण माता-भगिनींना एकच विनंती आहे की, माथाडीचे नेते नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांना शशिकांत शिंदे यांनी माथाडीमधून बाजूला केले. त्यामुळे नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांच्या पाठिशी तुम्ही उभे राहिले पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.