शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे सर्वाधिक इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:09 PM2019-09-05T12:09:38+5:302019-09-05T12:18:12+5:30
इगतपुरी, मालेगाव बाह्य,सिन्नर, नांदगाव आणि निफाड मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुकांनी हजेरी लावली होती.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, सर्वच पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. त्यातच भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे निश्चित समजले जात असले तरीही, या दोन्ही पक्षाकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा करण्यात आली आहे. तर दोन्ही पक्ष संपूर्ण २८८ मतदारसंघातील इच्छुकांची मुलाखती घेत आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपने घेतलेल्या मुलाखतीत सर्वधिक इच्छुक हे युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या पारंपारिक असलेल्या मतदारसंघातून आले असल्याचे पाहायला मिळाले.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेत सुद्धा भाजप-शिवसेनेची युती होणार असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून होत आहे. मात्र गेल्यावेळी प्रमाणे ऐनवेळी युती फिसकटली तर, उमेदवारांची शोधाशोध करण्याची वेळ येऊ नयेत. म्हणून दोन्ही पक्ष संपूर्ण २८८ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहे. बुधवारी भाजप पक्षाकडून नाशिकमध्ये शहरासह जिल्ह्यातील १५ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र यावेळी सर्वाधिक इच्छुकांची गर्दी युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या पारंपारिक असलेल्या मतदारसंघातून पाहायला मिळाली.
इगतपुरी, मालेगाव बाह्य,सिन्नर, नांदगाव आणि निफाड मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुकांनी हजेरी लावली होती. इगतपुरी मतदारसंघात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व माजी आमदार शिवराम झोले यांच्यासह १५ इच्छुकांनी मुलाखत दिली. तर मालेगाव बाह्यसाठी जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार व जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव यांच्यासह १५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
त्याचप्रमाणे सिन्नर मतदारसंघातून माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या व जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासह १५ इच्छुकानी भाजपकडून उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. तर नांदगाव मतदारसंघातून सुद्धा १४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्याचप्रमाणे निफाडमधुन माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार यांच्यासह १५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.
विशेष म्हणजे हे सर्व मतदारसंघ शिवसनेचे पारंपारिक मतदारसंघ समजले जातात. मात्र त्याच मतदारसंघात भाजपचे इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपच्या इच्छुकांच्या गर्दी पाहता शिवसेनेच्या विद्यमान आमदार आणि सेनेतील इच्छुकांची चिंता वाढू शकते.