"महाराष्ट्रात यावेळी भाजपची वेळ"; विजय रुपाणींनी सांगितले कशी होणार CMच्या नावाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:39 PM2024-12-03T12:39:20+5:302024-12-03T12:46:49+5:30
मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवरुन भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.
Maharashtra CM : महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरुन बरीच चर्चा सुरु आहे. भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं असलं तरी मात्र अद्याप एकही नाव समोर आलेले नाही. दुसरीकडे, ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. महायुतीने अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला नसल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भाजपचा मुख्यमंत्री होण्यास कोणतीही अडचण नाही आणि पंतप्रधान मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं म्हटलं होतं. अशातच यावेळी भाजपची पाळी असल्याचं भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांनी म्हटलं आहे.
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची निवड झाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी महायुतीतर्फे दावा केला जाणार आहे. त्याआधी केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत यासंदर्भातील बैठक होणार आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र निवडणूक निकाल आणि मुख्यमंत्री पदाबद्दलच्या चर्चांशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. "मला वाटते की भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. दुसरे म्हणजे, भाजपचा मुख्यमंत्री झाले तर मला काही अडचण नाही, असे विधान खुद्द एकनाथ शिंदे यांनीच केले होते. मला वाटतं यावेळी भारतीय जनता पक्षाची मुख्यमंत्रिपदाची पाळी आहे, असं विजय रुपाणी म्हणाले. मात्र, मला असं वाटतंय कारण माझ्याशी यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही असेही रुपाणी म्हणाले.
"मी आज मुंबईला जात आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनही रात्री मुंबईला पोहोचणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता आमच्या सर्व विधिमंडळ पक्षांची बैठक आणि तेथे चर्चा झाल्यानंतर सर्वसहमतीने नेता निवडला जाईल. त्यानंतर आम्ही ते नाव हायकमांडला सांगू. त्यानंतर नावाची घोषणा करु," असंही विजय रुपाणी म्हणाले.
#WATCH गांधीनगर: गुजरात के पूर्व मुख्यमंत्री और महाराष्ट्र के लिए केंद्रीय पर्यवेक्षक विजय रूपाणी ने कहा, "आज शाम को मैं मुंबई रवाना हो रहा हूं... कल सुबह 11 बजे विधायक दल की बैठक होगी जहां हम लोग चर्चा करेंगे और उसके बाद सर्वसम्मति से नेता का चुनाव होगा। जिसके बाद हम हाई कमान को… pic.twitter.com/8Rk5qP0RAA
— ANI_HindiNews (@AHindinews) December 3, 2024
दरम्यान, ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. हा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. या शपथविधीसाठी ४० हजार लोक जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार असल्याचे म्हटलं जात आहे.