Chandrakant Patil : 'मी मोदींना प्रणाम करतो', अनिल देशमुखांच्या अटकेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:32 AM2021-11-02T09:32:54+5:302021-11-02T09:34:55+5:30
Chandrakant Patil : नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले होते. त्यानंतर 13 तास चाललेल्या चौकशीनंतर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 'मी मोदींना प्रणाम करतो' या भाषेत प्रतिक्रिया दिली. (BJP Chandrakant Patil Comment on Anil Deshmukh Arrest By Ed enforcement directorate)
चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळे दरवाजे बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अटक झाली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दोषी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला शिक्षा मिळते. या कारवाईनंतर सर्वसामान्य माणूस सुखी होईल. त्यामुळे या व्यवस्थेला आणि या व्यवस्थेच्या आधारे धाक निर्माण करणाऱ्या मोदींना मी प्रणाम करतो.
अनिल देशमुख यांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक जीवन मात्र हादरले आहे. अनिल देशमुख यांसारख्या मोठा नेत्याने समाजासोबतच द्रोह केला तर सामान्य माणसाने विश्वास तरी कोणावर ठेवायचा. या अटकेनंतर किसी को भी सहा नहीं जाएगा हा मेसेज गेला. नरेंद्र मोदींच्या भाषेत सांगायचं तर झिरो टॉलरन्स. भ्रष्टाचाराला सहन करणार नाही. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला असा धाक निर्माण करेल की अन्य कोणी तसे करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील संजय राठोडांचा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा झाला. ज्याने महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला सुरक्षित करायचं, आश्वासित करायचं अशाच माणसाला अटक झाल्याने समाज जीवन पूर्णपणे अस्थिर झाले आहे. याचप्रमाणे बाकीचे सुद्धा जे सुपात आहेत ते जात्यात जातील आणि सर्वसामान्य माणूस आणखी आनंदी होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.