“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:05 PM2024-10-02T18:05:06+5:302024-10-02T18:12:04+5:30
BJP Chandrakant Patil: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० च्या पुढे जागा मिळतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
BJP Chandrakant Patil: एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरून बैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. यातच राज्यात सत्ता कायम राहावी, यासाठी भाजपासह महायुती जोरदार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे, असे विधान भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना देवेंद्र भुयार यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. देवेंद्र भुयार हे माझे चांगले मित्र आहेत. ते काय बोलले आहेत माहिती नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ महिलांचा अवमान करणारा असेल, तर त्यांना महाराष्ट्रातील महिलांची माफी मागायला सांगेन, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे
परमेश्वरावर महापुरुषावर आणि महान नेत्यांवर बोलण्याचे धाडस आणि उपमर्द फक्त संजय राऊत करू शकतात. कलम ३७० रद्द केले म्हणून अमित शाह यांना आपण दररोज नमस्कार केला पाहिजे. असे काम असणाऱ्यांना टोकणे हे संजय राऊतच करू शकतात, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला.
दरम्यान, २०२४ मध्ये तिन्ही पक्षांच्या मिळून १७० च्या पुढे जागा येतील. लाडकी बहीण योजना, त्याचबरोबर अन्य चांगल्या योजना या सरकारने लोकांना दिल्या आहेत. या योजना देऊन लोक उपकाराची भावना मनात न ठेवण्यासारखी महाराष्ट्राची जनता नाही. उपकाराची भावना काहींनी ठेवली असती, तर २०१९ मध्ये युतीचे सरकार आले असते. आता त्यांचे जे नुकसान झाले, ते झाले नसते, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता ठाकरे गटावर केली.