BJP-Shiv Sena: “शिवसेनेला अजून बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जमले नाही”; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 11:54 AM2022-01-27T11:54:56+5:302022-01-27T11:56:37+5:30
BJP-Shiv Sena: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आरोग्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये सुरु झालेले आरोप-प्रत्यारोप अद्यापही शमलेले दिसत नाहीत.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आलेले यातच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद वाढत जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या तब्येतीवरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप अद्यापही शमलेले दिसत नाहीत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर देत, शिवसेनेला अजून बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करणे जमलेले नाही, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यावर टीका करणारा राज्यातील विरोधी पक्ष हा नामर्द आहे. मात्र, राज्यातील जनतेने त्यांना प्रत्युत्तर दिले. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवतीर्थावरील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. त्यामुळे राज्यातील जनता उत्साहात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.
शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जमले नाही
मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर कोणीही टीका केली नाही. प्रत्येक वेळी त्यांची तब्येत बरी व्हावी, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली. तसेच आम्ही मुख्यमंत्रीपद सोडण्यास सांगितले नाही, तर पदाचा चार्ज दुसऱ्या नेत्याला देण्यास सांगतले होते. संजय राऊतांना यामध्ये चिमटा बसण्यासारखे काय होते, माहिती नाही. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक शिवसेनेला अजूनही जमलेले नाही, त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काम केले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुड्या सोडण्याची जयंत पाटील यांना सवयच आहे. असा कार्यकर्ता जाणार असेल, तर राजकारणात चढउतार असतातच. त्यांचे कार्यकर्ते आम्ही पक्षात घेतले त्याची संख्या छोटी नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.