Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, संजय राऊतांना तुरुंगात...”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:57 PM2023-04-04T13:57:01+5:302023-04-04T13:57:32+5:30
Maharashtra News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत. यातच आता या देशात जो प्रकाश पडलाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच. मोदी हेच सूर्य, मोदी हेच चंद्र, धुमकेतूही मोदीच आहेत. शीतल चांदणे मोदींमुळेच पडते. नद्यांचे वाहणे, समुद्राचा खळखळाटही मोदींमुळेच होतो, माझा श्वास चालतो, तोदेखील मोदींमुळेच, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजप नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही. तुरुंगात जावे लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. त्याचा परिणाम सामान्य माणसावर होत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देश वेगाने प्रगती करतोय
आजही सर्वांनी मोदींना जगातील सर्वात सर्वोच्च नेते म्हणून गौरवलं आहे. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देश वेगाने प्रगती करत आहे. आपली गंगाजळी म्हणजे परकीय चलन सुधारले. अनेक देशांनी रुपयात व्यवहार करण्यास मान्यता दिली. या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसाला कळतात. ते व्यवस्थित वर्तमानपत्र वाचतात, टीव्ही पाहतात. इंग्लंडला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. हे जगाला माहिती आहे. एखादा माणूस कशाचाही परिणाम करून घेत नसेल, तर त्यांनी कितीही शिव्या दिल्या तरी त्याचे समाधान केवळ शिव्या देणाऱ्याला असते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला गांभीर्याने घ्यायचे नसते
गेल्या चार महिन्यांपासून भेटीसाठी देवेंद्र फडणवीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर बोलताना, संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. फडणवीस त्यांना उत्तर लिहिण्यास सक्षम आहेत. देवेंद्र फडणवीस कधीही कुणाला भेट देणे टाळत नाहीत. विधिमंडळाचे अधिवेशन मोठा काळ चालले. इतिहासात पहिल्यांदा इतके दिवस अधिवेशन चालले. त्यामुळे फडणवीसांनी व्यग्र दिनक्रमात वेळ दिला नसेल. संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला गांभीर्याने घ्यायचं नसते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"