Maharashtra Politics: “भाजपची साथ सोडल्यावर उद्धव ठाकरेंच्या अधःपतनाला सुरुवात, सत्तेसाठी ओवेसींसोबतही जातील”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 03:26 PM2023-01-24T15:26:26+5:302023-01-24T15:28:05+5:30
Maharashtra News: ठाकरे गटातील कार्यकर्तेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहेत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा अखेर करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होत असल्याचे जाहीर केले. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेते या युतीवरून ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली त्याचवेळी त्यांचे अधःपतन झाले. बाळासाहेबांच्या नावाने मते घेतली,मात्र अडीच वर्षात तैलचित्र लावलं नाही, त्यांची संकुचित वृत्ती आहे. शिवसेनेची स्थापना करताना बाळासाहेबांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. काँग्रेसकडून वारंवार सावरकर यांचा अपमान करण्यात येत आहे. मात्र उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करणाऱ्या सोबत जाऊन बसले. अडीच वर्ष तुम्ही सत्तेचा उपभोगही घेतला, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात यायला हवे होते
सत्ता भोगत असताना उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावले नाही. त्यांनी फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भावनिक साद घालून मते मिळविली. त्यांनी विधिमंडळात यायला हवे होते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, आम्ही लढत असलेल्या चारही जागा आम्ही जिंकू. कोकणात आम्ही मुसंडी मारली आहे. तर मराठवाडा, अमरावती आणि नागपूर येथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकची जागा अपक्ष उमेदवारांची आहे. नाशिकबद्दल पक्षस्तरावर अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच कॉंग्रेसमधून निलंबित सत्यजित तांबे यांनी भाजपकडे अजूनही समर्थन मागितलेले नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहे. सत्तेसाठी ते ओवेसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील. ठाकरे गटाने प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्याचा काही फायदाही त्यांना होणार नाही. उद्धव ठाकरेंसोबतचे कार्यकर्तेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहेत. अनेक कार्यकर्ते येत्या काळात ठाकरेंची साथ सोडतील, असा दावा बावनकुळेंनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"